|| आठवडी बाजार ||

आठवडी बाजार                           

                                Weekly Market Nagpur

 
                        कधी एके काळी नागपूरच्या सक्करदरा भागात प्रत्येक बुधवारी आमच्या लहानपणी आठवडी  बाजार भरायचा..त्याला आम्ही बुधवार बाजार म्हणत. फळभाज्या,फुलभाज्या,पालेभाज्यां,रंगीबेरंगी फुलांनी,विविध खेळण्यांनी,खाऊच्या घमघमाटाने बाजार खुलून निघायचा. गावागावातून शेतकरी लोक आपापले साहित्य घेऊन विकायला यायचे ...विवीध दुकान लागायची..भांड्यांची,खेळण्यांची, कपड्यांची,भाज्यांची,फुलांची,फळांची ,मसाल्यांची. नुसता कलकलाट असायचा बाजारात. पण माला आवडायचे ते खाऊचे दुकान. कारण या दुकानासमोरून जाताना, गरमागरम सामोसे,कचोरी,पालकाचे वडे,बालुशाही,शेव,फाफडा, शंकरपाळे,चिवडा, आलुबोंडा( बटाटा वडा), खमंग ढोकळा, सांबारची पाटोडी (कोथिम्बीरपासून तयार केलेला एका नागपुरी  समोस्या सारखा खमंग पदार्थ) आणि अनेक पदार्थाच्या घमघमाटाने तेवढा दुकानाचा भाग दरवळून जायचा...आणि हा घमघमाट दूरवर पर्यंत साथ सोडत नसे. म्हणून मला बाजरात जायला खूप आवडायचं. एकदा का बाजारात आल कि आठवडाभराची खरेदी करूनच घरी जायचं

                                                          .Weekly Market Nagpur
                                
          आई बाबांपेक्षा मला या बाजारात आजी किंवा दादांसोबत(माझे आजोबा) जायला आवडायचं. तरी जास्त दादांसोबतच. आजीसोबत गेल कि व्यवहार अन भाव कसा करायचा हे शिकता यायचं, अन दादांसोबत गेल कि त्यांच्या सायकलच्या  ह्यांडलवर लावलेल्या खुर्चीत बसून मनमुराद बाजारचे लाइव्ह  चित्रण पाहायला मिळायचं. आजी ज्यावेळी दुकानदारासोबत भाव करायची तेव्हा कळायचं कि, आपल्या आजी सारख,  समोर भाजी विकायला बसलेल्या  काकू आजी काका याचं व्यवहार ज्ञान सुधा किती पक्क आहे, शाळेच तोंड सुद्धा न पाहिलेली हि लोक बसल्या जागेवर हिशोब हाताच्या बोटावर करायची. तेव्हा वाटायचं कस जमत असेल यांना हे सहज ? कोणी शिकवलं असेल ?  हि मंडळी  तर कुठल्या शाळेत पण गेलेली नाहीय.. पण जसजस मोठ होत गेलो तस कळायला लागल कि जगातल्या सगळ्यात मोठ्या शिक्षकांचे धडे  गिरवले आहे. तो म्हणजे आयुष्याचा अनुभव...अनुभव हा असा शिक्षक आहे कि एकदा शिकवायला सुरुवात करतो ते तुम्ही पूर्ण शिकल्याशिवाय थांबतच नाही. यात माणसाच गणित अस पक्क होत कि कुठलाही गणीतज्ञ इतक पक्क नाही करू शकणार.  M.B.A. न करताही नियोजनाचे आणि व्यव्हाराचे प्राथमिक धडे इथे मिळू शकतात. आणि खेळता खेळता त्यावेळी त्या निरागस माणसांकडून खूप काही शिकायला मिळायचं
                                                       
                                        आठवडी बाजार हे विक्रेत्यांसाठी कमाईच एक साधन असल तरी अनेकांसाठी व्यवहार ज्ञान शिकण्यासाठी अतिशय योग्य जागा आहे अस वाटायचं तेव्हा. अनेक परिवार त्यावर वर्षानुवर्षे जगत होती. माणसामाणसा मध्ये  व्यवहाराच्या व्यतिरिक्त आपलेपणा पण दिसायचा.मनाचा ओलावा जाणवायचा. दादांना ओळखणारी माणस “ मागच्या आठवड्यात दिसले नाही, तब्येत बरी नव्हती का?” अशी अलगद चौकशी करून जायची.  असे साधारण ४ ते ५ लोकांनी विचारल कि आपला आजा किती मोठा माणूस आहे असे मनातल्या मनात वाटून जायचं.  भाजी घेऊन झाली झाली कि मग मोर्चा वळायचा त, खाऊच्या दुकानासमोर दादांची सायकल थांबली कि, अर्ध मन तर त्या खमंग सुवासानेच भरून जायचं...मग गरमगरम शेव, आजीला आवडते म्हणून कचोरी,बालुशाही पेपरच्या पुडीत बांधली जायची. अन ती पुडी सुटायची ती एकदम घरीच...तोपर्यंत सायकलच्या खुर्चीत बसलेला मी आणि आणि खाऊच्या पिशवीमध्ये फक्त एक फुटाच अंतर असायचं  पण नुसत्या सुवासानेच मन माराव लागायचं... 
                                                                       
                                                                           Weekly Market Nagpur
                     
                                                         आज त्या आठवडी बाजारच स्वरूप बदललय..आपलेपणा संपून व्यवहार     आलाय..गरमागरम खमंग सुवास विरून हवाबंद पाकिटात हे पदार्थ  बंद झालेत, पाकीटावारचे चित्र सजीव वाटायला लागले अन आतले पदार्थ मात्र मरगळ घेऊन आत बसून सुटकेची वाट पाहू लागलेत. भाज्या ताज्या दिसाव्या म्हणुन पाणी शिंपडून फ्रेश करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागलाय. शेतकऱ्यांकडून २ रुपयाला घेऊन ५० रुपयाला वारंवार पाणी शिंपडून विकल्या जाऊ लागल्या. सुवासिक फुलांची अलर्जी होऊन ते परफ्युमच्या बाटलीत बंद होऊन केमिकल स्वरूप सुवास  फ्रेश सुवास म्हणून महागड्या बाटलीत विकल्या जाऊ लागला. एकंदरीत काय तर उपरसे टामटूम और अंदरसे झामझूम  अशी अवस्था झालीय. फवारणीचा माल खुलेआम विकला जाऊ लागला अन चांगल्या भाज्या ज्या आधी आपण नियमित खात होतो होतो त्याच आता ऑर्गनिक वेजिटेबल म्हणून भरमसाठ पैशांमध्ये विकल्या जातात.कारण आम्हाला मराठीत सांगितलं तर कळत नाही,अन एखादा इंग्रजी शब्द वापरला कि वाटत कि खरच हे खूप काहीतरी मोठ आहे...असो जास्त शिकलेल्या अनपढानची संख्या सध्या खूप वाढतेय तशीही.  
                         असो... दादा आज नाहीय, आजी आहे. पण दादांच्या आठवणी आणि  त्या आठवडी बाजाराच्या आठवणी कायम...अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मनात राहतील हे नक्की. दूर असलेला आठवडी बाजार आज अगदी आमच्या घराच्या बाल्कनीतून दिसतो..घराजवळ आला बाजार..दर शनिवारी अगदी न चुकता बाजार जोमात भरतो..खूप गर्दी असते कलकलाटही असतो पण, आमचे दादा,त्यांची सायकल..त्यावरची ती खुर्ची गर्दीत हरवलीय. अन हरवली ती निरागस माणस..तो फुलांचा दरवळ. ते रंग,,अन तो घमघमाट  जो कुण्या गरिबाची भूक सुवासानेच भागवायचा तो कायमचा कागदाच्या पुडीत घट्ट बंद झालाय. बघू पुन्हा या मौल्यवान वस्तू सापडल्या तर...अन ती खाउची पुडी पुन्हा उघडता आली तर...


Weekly Market Nagpur

2 comments:

  1. Waaaa....lahan panichya athwani tajya jhalya..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.. असे ब्लाॅग वाचण्यासाठी फाॅलो करा.

      Delete

Do not Post any Abusive Content or word or Spam Links in Comment Box.