शिवबा हवे की जिजाऊ ?

 


                     साधारण चौथ्या वर्गात असताना, इतिहासाचे पुस्तक हाती आले. शाळेचे नवे वर्ष अगदीच सुरु झाले होते. त्यावर्षी त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ असे चित्र होते. एका हातात तलवार, एका हातात घोड्याची  लगाम,मागे काही मावळे आणि निसर्गरम्य असा देखावा. पिळदार शरीरयष्टी , डोळ्यात करारीपणा, चेहऱ्यावर तेज, भरदार दाढी-मिश्या आणि डोळ्यासमोर एकच ध्येय ‘स्वराज्य’. त्या चित्राला राजा रवी वर्मा यांनी अप्रतिम रेखाटले होते.

             

शिवछत्रपती, शिवाजी महाराज
             आता पर्यंत शिवरायांबद्दल घरातल्या मोठ्यांकडून फक्त ऐकले होते, ते महाराज पहिल्यांदा डोळ्यांनी त्या चित्रात पाहिले. मन भरून आले होते आणि अभिमानही वाटला ,कारण ज्या शिवरायांनी या महाराष्ट्राला राखले ,स्वराज्य उभे  केले होते. त्या पावन भूमीत जन्म व्हावा यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्ट असूच शकत नव्हती. खूप कौतुक वाटायचे त्यावेळी शिवाजी महाराज आणि मावळ्यांबद्दल ऐकून. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबद्दल ऐकताना एक स्फुरण चढायचे. सुरुवातीला इतिहास म्हणजे कंटाळवाणा विषय वाटला होता,पण जसजसे महाराज आणि त्यांच्या आयुष्याबद्दल कळायला लागले तसतसा महाराजांबद्दल आदर वाढला. आणि इतिहासात मन रमायला लागले.  इतिहास असा घोकंपट्टी करून लक्षात राहत नाही तर त्यासाठी इतिहासातलं प्रत्येक पात्र तुम्हाला जगावं लागत हे त्या वरून लक्षात आलं.

                छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक तेज, एक चैतन्य, एक विचार, एक शूर योद्धा, रयतेचा एक महान राजा, उत्तम व्यवस्थापनेच एक जिवंत उदाहरण, शब्द कमी पडतील, सगळे शब्दकोश संपतील महाराजांबद्दल वर्णन करायला. इतकं मोठं आणि बहुआयामी आहे शिवचरित्र. नियतीने अश्या थोर राजाला खूप कमी आयुष्य दिलं, पण कमी आयुष्यात सुद्धा समृद्धपणे कसं जगावं आणि जगायला शिकवावं हे महाराजांच्या जीवन प्रवासातून आज ४०० वर्षानंतरही शिकता येतं. त्यानंतर जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज हा विषय यायचा तेव्हा तेव्हा आपण हा इतिहास फक्त शेवटच्या परीक्षेत पास होण्यासाठी शिकतोय अस कधी वाटलच नाही. जेव्हा जेव्हा जिथे मिळेल तशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायला लागलो.

आऊसाहेब जिजाऊ आणि शिवबा राजे

              नंतर नंतर ते जरा कमी झालं कारण कॉलेज सुरु झालं, त्याच एक वेगळ वातावरण होत.आणि याच दरम्यान हाती आली, रणजित देसाई यांची कादंबरी“ श्रीमान योगी”. साधारण १२०० पानांची हि कादंबरी पाहून जरा मनात विचार आला की कधी वाचणार ही मी..? कितीमोठी आहे ? यातलं सगळं जर टीव्ही वर किंवा सिनेमात पाहायला मिळाला तर किती बर होईल ना?आणि खरच असे झाले, महाराजांवर आज पर्यंत अनेक सिनेमे झाले, हिंदीत मालिकाही झाल्या. पण २००८ साली डॉ. अमोल कोल्हे यांची ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका आली आणि आनंदाला पारच राहिला नाही..कारण मी मुळातच  फिल्म मिडीयाचा विद्यार्थी. तेव्हा दृक्श्राव्य माध्यम हे जास्त जवळच वाटतं मला. वाचताना आपण एखादी  गोष्ट फक्त मनात रंगवू शकतो, कल्पनेच्या रंगांनी ते चित्र ते मानसपटलावर रेखाटू शकतो पण हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित असतं. इतरांना त्याचा आनंद घेता येत नाही. म्हणून जेव्हा आपण बालपणी वाचलेली एखादी गोष्ट टीव्ही किंवा मोठ्या पडद्यावर प्रत्यक्ष बघतो त्याचा आनंद काही औरच असतो.ते जास्त जवळचे वाटते.

           डॉ. अमोल कोल्हे यांनी रंगवलेली महाराजांची भूमिका हि डोळ्याच पारणं फेडणारी होती. किती तरी प्रसंगात तर डोळे भरून यायचे. इतकं सुंदर दिग्दर्शन आणि सादरीकरण होतं त्याच.ते पाहत असताना पुन्हा एकदा विचार आला हे जर इतकं सुंदर आहे तर श्रीमान योगी ही कादंबरी किती सुंदर असेल. आणि बघण्यासोबत वाचनाचा प्रवास सुरु झाला. श्रीमान योगी वाचत असताना आणि राजा शिवछत्रपती पाहत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल खूप वाचतो, बोलतो, ऐकतो, पण या सगळ्याच्या मागचा खरा सूत्रधार कोण हे जाणून घेण्याचा शोधच घेत नाही. लहानपणी फार तर सातवीत किंवा आठवीत असताना आजीच्या तोंडून एक वाक्य ऐकण्यात आल होतं ‘शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी’ आणि मनात प्रश्न आला की, का शिवाजी जन्मावा शेजारच्या घरी ? आपल्या घरी जन्म का घेऊ नये ? प्रश्न तसा सोपा होता. पण म्हणतात ना  की जे सोपं असतं तेच खूप कठीण असतं. 

राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा
          आता खरा विषय इथे सुरु होतो, शिवाजी महाराज प्रत्येक घरात जन्म घेऊ शकतात. पण जन्म देणारी आई ही आधी जिजाऊ व्हावी लागते. शिवाजी महाराज यांच्यापुढे आज अवघा महाराष्ट्र नतमस्तक होतो, संपुर्ण देशातल्या आणि देशाबाहेर सातासमुद्रापार महाराज लोकांच्या मनावर आजही अधीराज्य करताहेत.  व्हिएतनाम सारखा देश आज त्यांच्या अभ्यासक्रमात महाराजांविषयी आणि त्यांच्या व्यवस्थापनेविषयी  शिकवतो. याचाच अर्थ महाराज हा एक असा विचार आहे जो सर्वदूर पसरलाय...आपण साधारणतः जेव्हा महाराजांबद्दल वाचतो, ऐकतो, तेव्हा त्यांच्या कार्यासमोर नतमस्तक होतो, त्यांची वाह वाह करतो, त्यांच्याबद्दल अपार आदर वाटतो , असा राजा पुन्हा होणे नाही असे आपल्या तोंडातून अनायास निघते पण सहजच हे म्हणत नाही की शिवाजी महाराज माझ्या घरात जन्म घ्यावे..कारण आज आपल्या पुढे असलेले सिंहासनाधिष्ट महाराज आणि बालपणीचे शिवबा यातला जो कणखर संघर्ष आहे तो आपल्याला नको असतो.. बाल शिवबा जन्म घेतीलही...पण तुमची जिजाऊ व्हायची तयारी आहे का ?...कारण शिवाजी घडण्यासाठी आधी आजच्या जिजाऊला दूरदृष्टीकोन ठेवणे, खंबीर होण, ध्येय मोठ ठेवणे, मातृभूमी आणि तीच संरक्षण याची जाणीव होण, आणि त्यासाठी लागणारा मनातला अग्नी सातत्यानं प्रज्वलित ठेवणं खूप गरजेच आहे. कारण शिवबा घडवायचे असतील तर आजच्या प्रत्येक आईला आधी जिजाऊ होण खूप गरजेच आहे.

                     शिवबा घडवायचे म्हणजे नेमके काय? तर फक्त हातात तलवार आणि सतत लढाई? नाही.....हातात तलवार घेऊन लढणारे शिवबा एकवेळ सहज कळतीलही..पण खरे शिवाजी महाराज समजणे हे साधे साधेसुधे नव्हे. त्यासाठी आधी आपल्या डोक्यातली हाती तलवार घेऊन स्वारीवर निघालेली त्यांची प्रतीमा थोडावेळ बाजूला ठेवणे गरजेचे आहे आणि वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे बघणे खूप गरजेचे आहे....आज परिस्थिती बदलली आहे. रामायण, महाभारत, थोर विचारवंताचे लेखन, कादंबऱ्या, ग्रंथ, आपल्या देशातल्या अनेक ऐतिहासिक पात्रांची ओळख करून देणे हे आपल्याला नकोसे वाटते. त्या वीर यशोगाथा सांगणे ,त्यांच्या कथा सांगणे,आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, रोजच्या आयुष्यातले दैनदिन संस्कार मुलांना देणे, आज आजची आई विसरलीच आहे..माझा कुठल्याही आईला तिच्या विचारांना विरोध नाही.कुठल्याही आईला बोल लावण्याइतकी माझी कुवतही नाही. पण एक सामान्य नियम आहे सृष्टीचा, कि जेव्हा एखादं लहान बाळ जन्म घेतो, तेव्हा  तो इतरांपेक्षा आईशी जास्त जुळलेला असतो. त्याच्या भोवती सगळे असतात, पण वयाची काही वर्ष तरी तो आईवरच अवलंबून असतो. तिच्याशिवाय त्याच दुसरं विश्वच नसतं. मग अश्यावेळी आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून जगणारी आई व्हायचं कि कणखर आणि निर्धाराने पक्की अशी जिजाऊ व्हायचं ते त्या आईनेच ठरवायला हवं. कारण तेव्हा परकीय शत्रू हे स्थूल स्वरुपात स्पष्ट दिसणारे होते, पण आज हे विकृत शत्रू विचारांच्या रूपाने फोफावत चालले आहेत. अश्यावेळी त्यांना शोधून जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला शिवबाचे स्वरूप द्यायलाच हवे.

राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा

        त्यावेळी रामायण महाभारतातुन आणि इतर अत्यंत उपयुक्त ग्रंथ आणि गोष्टींमधून जिजाऊने आपल्या शिवबांना राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शौर्य , पराक्रम, न्याय आणि नितीमत्ता असे महत्त्वाचे धडे दिले तर इतिहासात घडलेल्या अनेक गोष्टीतून या परकीयांशी लढताना काय चूक करू नये हे शिकवले. म्हणजेच  काय तर सोप्या शब्दात सांगायचे तर कुठलेही कार्य करायच्या आधी व्यवस्थापन चोख असणे गरजेचे आहे हे जीजाउंनी शिकवले. काही लोक म्हणतीलही कि त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, पण आज मग वेगळं आहे? फरक फक्त इतकाच आहे की, शत्रू त्यावेळी समोर स्पष्ट दिसायचा आता तो विकृत स्वरूप घेऊन विचारांच्या खोलीत घर करून राहतोय. मग अश्या शत्रूशी लढायला आपण आपल्या मुलांना कधी शिकवणार? जरा गार हवा आली थंडी वाजेल, उन्ह वाढलं अंग भाजेल, पाऊस आला , भिजशील आणि सर्दी होऊन ताप येईल. अश्या भीतीच्या वातावरणात आपण सतत मुलांना कमकुवत आणि कमजोर करत असतो. त्यांना आलेल्या परिस्थितीशी तोंड द्यायला शिकवतच नाही..तो अजून लहान आहे म्हणून सतत त्याला सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवतो, आणि मग जेव्हा वेळ येते एकट्याने लढायची तेव्हा मात्र त्याला अश्या आधाराची आणि कुबड्यांची गरज सतत भासत असते. निसर्गापासून जितकं मुलांना दूर ठेवाल तितकी मुलं शारीरिक आणि बौद्धिक रूपाने कमजोर होतील.

                जिजाऊ मासाहेबांनी जर शिवाजी महाराजांना अशीच बंधन घातली असती, हे करू नको, ते करू नको,इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, तिथे थंडी वाटेल,सर्दी होईल,ताप येईल, तर आज छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक साधे राजे असते. आणि स्वराज्य हा शहाजी महाराज साहेबांचा विचार तिथेच संपला असता. शिवबा मातीत खेलेले, उन्ह वारा पावसात रमले, म्हणून आज राजे ४०० वर्षानंतरही लक्षात आहेत, आपणच आज आपल्या संस्कृतीला दूर सारून पाश्चात्य संस्कृतीच्यामागे इतके आंधळे झालो आहोत की आपल्याला कळत नाहीय की आपणच आपले घर एखाद्या भुंग्यासारखे पोखरतोय.

Image curtsy- Nilesh Auti

               निसर्गाने प्रत्येक स्त्रीला एक विशिष्ट शक्ती दिली आहे. आणि त्यातल्या त्यात  सर्वोच्च स्थानावर असेलला आई होण्याचा बहुमान निसर्गाने तिला बहाल केलाय. असे म्हणतात की ज्या घरात आई ही खंबीर, कणखर, संस्कार जाणणारी आणि संस्कार देणारी असेल त्या घराच सोन होत. मग हीच आई आपल्या मुलांच्या सुरुवातीच्या काळातली गुरु असते..म्हणून आई होताना सामान्य आई होण्यापेक्षा ती आई जर  जिजाई झाली तर शेजारच्याच्या घरात जन्म घेणारे शिवबा नक्की आपल्या घरात जन्म घेतील, प्रत्येक घरात जन्म घेतील .कारण राजमाता जिजाऊने जे शिवबा घडवले ते फक्त व्यक्तिमत्व नव्हतं तर तो एक विचार होता.  महाराज एक नव्हते तर महाराजांचा प्रत्येक मावळा हा शिवस्वरूप होता..कारण छत्रपती शिवाजी हा विचार एका व्यक्तीपुरताच कसा सिमीत राहू शकतो ना ? म्हणून वाटते की, शिवाजी आता शेजारच्याच्या नाही तर प्रत्येक घरात जन्म घ्यायची वेळ आलीय. पण त्याआधी  प्रत्येक घरातल्या आईने जिजाऊ व्हायची वेळ आलीय. कारण जिथे जिजाऊ असतील तिथे शिवबा नक्की जन्म घेतीलच. आणि शिवबा असेल  तिथे स्वराज्य नक्की असेल.

आजची आई जिजाऊ आणि बाळ शिवबा प्रतीकात्मक चित्र
Art by - Vikas Surwase

 

 

 

               

 

  

कोरोनाच्या सुट्टीतली ऑनलाईन शाळा.


     

Online Schooling, pic Curtsy- PNGTREE

 

              साधारण फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनामुळे (Corona-Covid-19) सगळं जीवन एकाच जागेवर थांबल्यासारख झालं आहे. परिस्थिती पूर्ववत कधी येईल कुणालाच माहिती नाही. फक्त अंदाज बांधण्याशिवाय पर्यायच नाहीय. हवेतली पतंग उंच आकाशी जाते पण तिचा जसा नेमका  ठावठिकाणा नसतो, कुठलाच अंदाज बांधता येत नाही, तसं सध्या सुरु आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत  सगळ्यांनी परिस्थितीशी जुळवून घ्यायला सुरुवात केली आहे. पण दैनंदिन  कामं थांबून कस चालेल ना..? काही गोष्टी अश्या असतात ना की ज्यांनी थांबून किंवा त्यांना थांबवून चालत नाही. परिस्थिती कुठलीही असो. डॉक्टर, पोलीस, पालिका यंत्रणा, आणि इतर आपात्कालीन सेवा ह्या थांबुन चालाणारच नाही. याच सोबत अत्यंत महत्त्वाच म्हणजे  शिक्षण क्षेत्र.   

            शिक्षण क्षेत्रावरून आठवलं परवा एका मित्राने विचारलं, “सध्या ज्या ऑनलाईन शाळा सुरु आहेत त्याबद्दल तुला काय वाटतं?” मुळात मला काय वाटतं, याचा विचार सध्या करतय कोण...? इथे ‘मला’ ही संज्ञा मी माझ्या स्वतःसाठी वापरली नसून समस्त सामान्य किंवा मध्यम वर्गीय माणसासाठी वापरली आहे. कारण जरा खोचक वाटेल पण एक उदाहरण देतो. कोरोना मुळे लॉकडाउन सारखे कठोर पण आवश्यक पाऊल सरकारला उचलावे लागले. यात संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. कामं थांबली, आवक थांबली. ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात आहे त्यांना काही प्रॉब्लेमच नव्हता. त्यांना हा निर्णय योग्य वाटला. तो होताही. कारण ते आवश्यक होतं. तळागाळातल्या गरीब लोकांना हा निर्णय अन्याय वाटला. कारण आज कमवा आणि आज खा..असे त्यांचे जीवन होते. कमाई नाही तर खाणेही नाही. म्हणून त्यांची चिडचिड झाली. मग अश्यांना ज्यांच्याकडे सगळं मुबलक आहे त्यांनी समाजसेवा म्हणून किंवा या समाजाच आपण काही देणं लागतो या तत्त्वाखाली जशी जमेल तशी मदत करायला सुरुवात केली.       पण समाजाच्या या दोन टोकांमध्ये एक थांबा येतो...तो म्हणजे मध्यमवर्गीय माणूस. या मध्यम वर्गीय माणसाबद्दल कुणीही विचार करत नाही. स्वतःचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी त्याला रोज काय काय कसरत करावी लागते हे त्यालाच माहिती असतं. कारण त्याचे कुठलेच हफ्ते बंद झाले नसतात. या सगळ्या हफ्त्यात एक महत्त्वाचा हफ्ता येतो,,, मुलांच्या शाळेचा हफ्ता.  

Online Schooling, Pic curtsy- PNGTREE

                 शाळा सुरु कराव्या की नको या गोंधळात एकदाच्या शाळा सुरु झाल्या. पण ऑनलाईन. छोटी छोटी मुलं, तासंतास लॅपटॉप, कंप्युटर, मोबाईल, याच्यासमोर इच्छा नसतानाही बसू लागली. आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. नव्या व्हर्च्युअल क्लासेसची. पण मुले या प्रकारे खरच शिकायला लागली का किंवा त्यांना या सगळ्यात इंटरेस्ट असतो का? हा मात्र मोठा प्रश्न आहे. या सगळ्यात शाळा मात्र खऱ्या अर्थाने मागे पडली. एकत्र, एकसाथ, एकसुरात होणारी प्रार्थना, ती शाळेची बेल, मधली सुट्टी, मित्रांसोबत एकत्र बसून खाल्ला जाणारा डबा, नव्या पुस्तकांचा सुवास, रोजची हजेरी, शालेय शिस्त, आणि शाळा हे सगळं कुठल्या कुठे विरून गेलं.  मुलांच्या शाळेसोबत आता ह्या कसरतीचा अर्धा शेअर पालकांना ही उचलावा लागला.

             माणूस हा मुळातच समाजशील प्राणी....त्यामुळे जेव्हापासुन लॉकडाउन सुरु झाले तेव्हा पासून सगळी मंडळी घरात राहू लागली. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढू लागला त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई होती. बाह्य जगाशी त्याचा संबंध कमी झाला. त्यामुळे घरून ऑफिसची कामं होऊ लागली, आणि ह्या सगळ्यात अजून एक काम वाढले, ते म्हणजे मुलांसोबत पालकांना त्याच्या ऑनलाईन शाळेसाठी बसावे लागले. प्रत्येक शाळेची क्लासेसची वेळ, त्याच्या वर्गाचा कालावधी वेगवेगळा आहे. वेगवेगळ्या शाळांच्या क्लासेसची सरासरी वेळ जर काढली तर क्लासला साधारण २ तास तरी  त्या मुलाला या व्हर्च्युअल क्लाससाठी मोबाईल किंवा कम्प्युटरसमोर बसावे लागते. सहाजिकच त्या पालकाला आपल्या पाल्यासोबत शाळा पूर्ण होतपर्यंत बसावे लागते. कारण कधी इंटरनेट कनेक्शन ठीक नसते तर कधी आवाज कमी येतो.तर कधी शिक्षक नेमक काय बोलले त्यांनी काय शिकवले हे मुलांना कळत नाही आणि ती उणीव मग पालकांना भरून काढावी लागते. त्याचसोबत दिवसभरात दिलेला गृहपाठ पूर्ण करवून घ्यावा लागतो. म्हणजे पूर्ण दिवस मुलांची तयारी पण पालकांनीच करायची आणि शाळेला फी पण त्यांनीच द्यायची. It is actually Ridiculous.


                                                                                                                               

     या सगळ्यात एका गोष्टीच खूप समाधान वाटते कि, जे शिकवलं जातंय त्याची पुनरावृत्ती परत एकदा पालकांच्या आयुष्यात होते. शिकवण्याच्या पद्धती बदलल्या असतील पण परत एकदा पालकांना आपल्या पाल्यामुळे शाळेत गेल्याच आणि त्या अभ्यासाच सुख मिळतंय.कारण शाळेची मजा, त्यातला आनंद, त्यातलं सुख काही औरच होत. शाळेचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातले सुवर्ण दिवस असतात. एकदा ते सरले की ते परत येत नाही. पालकांनी जगलेले ते दिवस अगदी जसेच्या तसे नाही पण मुलांमुळे पुन्हा ते सुख अनुभवता येत आहे याचे समाधान नक्कीच आहे. मुलांना घेऊन बसण्यात , कामात जरा वेळ काढून यात गुंततांना मन मात्र हळुवार इतिहासाची पानं अलगद उघडून वर्गात जाऊन बाकावर कधी विसावलेलं असत कळतही नाही. कानी फक्त येत असतो शिक्षकांचा शिकवण्याचा आवाज. डोळ्यासमोर येतं, मराठीच व्याकरण, भूमितीचे प्रमेय, इतिहासातले पात्र, भूगोलाचा व्याप, इंग्रजी शब्दांची मेंदूत घुसण्यासाठी चाललेली तळमळ,  गणितातलं कोडं, आणि विज्ञानाचे प्रयोग...

                 जरा दगदगीच असलं, तरी हे सगळ सुखावह वाटते....पण सत्य शेवटी भयानक असत. कारण हि बाजू झाली पालकांच्या भावनेची, पण एका नाण्याला जश्या दोन बाजू असतात, तशी यालाही आहे. दुसरी बाजू म्हणजे, प्रत्येक शाळेची एक स्पर्धा चाललेली आहे कि कसेही करून शाळा सुरु ठेवायची..त्यामागे त्यांचा स्वार्थ नक्कीच आहे की, शाळेची जी दुकानदारी जम धरून बसलीय ती या कोरोनाने, बंद पडू नये.....जरा स्पष्ट आहे पण खर आहे. कारण या लोकांना शिक्षाणाचे काही घेणे देणे नाही. त्यांना यात दिसतो. तो फक्त बिझनेस. शिक्षणाचे महत्त्व आणि त्यातले पुण्यकर्म त्यांना कळले असते तर यांनी LKG/UKG सारख्या साध्या वर्गांची फी लाखाच्या घरात ठेवली नसती. कारण शाळा आता शाळा राहिल्या नसून International School झाल्या आहेत. आणि एक शाळा जेव्हा School होते तेव्हा विद्यादानाचे उद्दिष्ट बाजूला राहून व्यवसाय सुरु होतो.

                 १९९९ ते २००० पर्यंत शाळा हे एक विद्यादानाच केंद्र होत. त्यानंतर मात्र त्याच स्वरूप बदलून, त्याला व्यावसायिक स्वरूप आलं. ज्यात फक्त पैसा असलेल्या पालकांच्या  मुलांनाच प्रवेश, उत्तम आणि नीटनेटका ड्रेस, सुरक्षा, शाळेच्या स्पेशल बसेस, आणि शेवटी जमलच तर शिक्षण आणि ते ही मातृभाषेला किनारा देऊन इंग्रजी शिक्षण माध्यमातून, असे निकष ठेवण्यात आले. काही मोजक्याच शाळा खऱ्या अर्थाने शाळा राहिल्या. ह्या सगळ्याला सिस्टीम किंवा त्या संस्था जेवढ्या जवाबदार आहेत तेवढेच आपणही .कारण आपण शाळेचा मूळ उद्देशच विसरलो. त्यांनी मागितलेली लाखाच्या घरातली फी आपण सहज देऊ लागलो, कारण आपल्याला वाटले की, मुलं इंग्रजी माध्यमातून शिकली की, अधिक जास्त प्रगल्भ होतील. पण एक आवर्जून सांगतो, काही वर्षातच आपल्या डोळ्यावरचा हा पडदा दूर होईल. कारण मातृभाषेतलं घेतलेलं शिक्षण हे मुलांना जास्त प्रगल्भ करत हे सिध्द झालय. आज या कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळात १००% नाही पण काही  टक्के पालकांना हे नक्की कळून चुकलय कारण त्यांना अश्याही परिस्थितीत पूर्ण फी भरावी लागतेय. आणि त्याला सरकारने सुद्धा काही पर्याय ठेवला नाही. ऑनलाईन शाळा आहे म्हणून फी अर्धी घ्यावी कारण परिस्थिती सगळ्यांचीच खराब आहे, असे काही मुद्दे मधल्या काळात उठले जरूर पण त्याचा काही फायदा झाला नाही. शाळांना आदेश देण्यापेक्षा उलट सरकारने सामान्य नागरिकांनाच पर्याय दिला की, लॉकडाऊन संपल्यावर ३ महिन्यांनी फी भरा. तो पर्यंत नाही दिली तरी चालेल. आणि शेवटी मरण झाले ते मध्यम वर्गीय सामान्य माणसाचेच.


             

   या सगळ्यात समाधानाची बाब म्हणजे शिक्षक. ते ही सामान्य नागरिकांतच मोडतात. इतरांसारखे त्यांनाही आयुष्य आहे. मुलांना दुसऱ्या दिवशी शिकवायचे म्हणजे त्यांनाही पुढच्या दिवसाचा अभ्यास करावा लागतो,त्यासाठी तयारी करावी लागते. त्यांच्यासाठीही हे सगळं नवीनच होतं. ते सुद्धा दिवसभर सगळी कामं करून हे काम करतात. निश्चितच त्यांना याचा पगार मिळतो.पण हे काम ते आवडीने आणि इमानदारीने करतात. फक्त आता चिंता वाटत होती गावातल्या, दुर्गम भागातल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची. कारण तिथे ना इंटरनेट होते ना महागडे मोबाईल किंवा कंप्युटर. पण म्हणतात ना की इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो. भामरागड,गडचिरोली इथे  कोरोनामुळे सुट्टीत घरी परत गेलेल्या विद्यार्थ्यांना संचारबंदीमुळे परत शाळेत येता येत नव्हते, आणि दुर्गम भागात घरे असल्याने इंटरनेटही नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होऊ नये, इतरांप्रमाणे त्यांनाही शिक्षण नियमित मिळावे यासाठी, लोकबिरादरी आश्रम शाळेचे (हेमलकसा) संचालक अनिकेत आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे यांच्या संकल्पनेतून “शिक्षण तुमच्या दारी” हा उपक्रम राबवला गेला. भामरागडच्या दुर्गम भागात  जिथे जिथे हे विद्यार्थी राहतात त्या ठिकाणी जाऊन झाडाखाली, किंवा मोकळ्या जागेत सरकारच्या आदेशांचे पालन करत, सोशल डिस्टन्स ठेवून ह्या शाळा सुरु केल्या गेल्या आणि याप्रकारे शिक्षक शिकवू लागले आणि विद्यार्थी आनंदाने त्यांचे शिक्षण घेऊ लागले. हि या सगळयामधली अत्यंत समधानकारक बाब आहे.

                 शाळेचे बाजारीकरण करणारे करत राहतील, कठीण काळातही ते व्यवसायाच्या संधी शोधत राहतील. पण आयुष्यभर लक्षात तेच राहतील ज्यांना विद्यादानाचे खरे व्रत कळले आहे. शिक्षण हा सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो मिळालाच  पाहिजे.