|| मुकुंदनाद ||

   || मुकुंदनाद || 




                    कलाकार म्हणजे कोण ? कलावंत नेमके कुणाला म्हणायचे ? मला वाटत याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते. कलावंत हा प्रत्येकात दडलेला असतो.पण प्रत्येक व्यक्तीला आतल्या कलाकाराचे दर्शन होईलच असे नाही. ज्याला झाले तो स्वतःच आयुष्य तर समृद्ध करतोच पण त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांना तो समृद्ध करतो. जसे चंदनाच्या झाडाच्या भोवतालची सगळी छोटीमोठी झाडं थोड्या फरकाने का असेना पण सुवासिक झालेली असतात. 

                  खरा कालाकार असा निर्माण करता येत नाही. कला आणि त्यासाठीची उत्कट भावना आणि जिद्द ही उपजत असावी लागते. ही जिद्द प्रत्येक माणुस जन्मतःच घेऊन येतो.कलाकाराच्या घरीच कलाकार किंवा गरीब-श्रीमंत असे समीकरण तिथे लागू होत नाही. सामान्य माणसाला श्वास घेण्यासाठी एक चैतन्य लागत , ज्याला आपण आत्मा म्हणतो, तसा कलाकाराची कला हाच त्याचा आत्मा असतो. जसजशी त्याला त्याची ओळख होत जाते तसतसे त्याचे आयुष्य अधिक संपन्न होते.

                 व. पु. काळे तर म्हणतात की, “व्यवहारात कलाकार हा सामान्यांहून निराळा वागणारा असतो. राग, लोभ , प्रेम, अभिलाषा, माया ह्या सगळ्या संवेदना पराकोटीच्या प्रखर असतात, आणि कुठल्या भावना कधी उफाळून येतील याचे संकेत पण सामान्याहून निराळे असतात.” म्हणूनच एका कलाकाराला समजणे सगळ्यांनाच जमेल असे नाही. एकंदरीत काय तर एक कलाकार एक अवलियाच असतो, स्वतःच्याच दुनियेत मस्तकलंदर होऊन जगणारा. पण कलाकार होण इतक सोपं नसत. तपस्येशिवाय इथे पर्याय नाही . वेळ प्रसंगी अपमान, राग, तिरस्कार पचवण्याची ताकद लागते. बऱ्याचदा कमीपणा घ्यावा लागतो. तेव्हाच त्या कलाकारला सोन्यासारखी झळाळी येते.

                           आज ज्या व्यक्तीबद्दल किंवा कलाकाराबद्दल सांगायचे तो ही या पासून निराळा नाही. सगळ्या संवेदना ह्या अगदी तश्याच. पण हा कलाकार त्याच्या कलेतल्या वेगळेपणासाठी जास्त ओळखला जातो. मी म्हणालो ना की, कालकार मुळात जन्म घेतो. इथे तर या कलाकाराला पहिली ओळख दिली, ती त्याच्या आई वडिलांनी दिलेल्या नावाने आणि त्यासोबत असलेल्या आडनावाने. याचा प्रयत्य तुम्हाला नक्की येईल.

 

Mukund-Lekurwale-Flute-Maker
Mukund Lekurwale


                      
आज सामान्य माणसापासून ते भारतीय संगीत क्षेत्रातल्या दिग्गज बासरी वादकांना ज्याने तयार केलेल्या बासरीची ओढ आहे, त्या मुकुंदाचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. घरी कुठलेच संगीताचे वातावरण नसलेल्या मुकुंदाने आज संगीत क्षेत्रात त्याचे नाव जगभर सर्वदूर पसरवले आहे ही आम्हा मित्रांसोबत त्याच्या घरातल्या प्रत्येकासाठी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे. नागपूरचा हा मुकुंद एक
Celebrity Flute Maker म्हणून भारतातच नाही तर भारताबाहेरही ओळ्खला जातो.

                      मुकुंदाला, घरी तसे संगीताचे वातावरण नव्हते. बँकेत नोकरीला असणाऱ्या त्याच्या वडीलांनी, साधारण १९७१-७२ साली त्यांच्या पगाराएवढ्या किमतीचा एक रेडियो विकत आणला. त्यावेळी मनोरंजनाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने रेडियो दिवसभर सुरु राहायचा. त्यावर सरू असलेली हिंदी मराठी गाणी किंवा शास्त्रीय संगीत सतत कानावर पडायचं. इथूनच त्याला संगीताची ओढ लागली. शास्त्रीय संगीत आवडू लागले. पण ते शिकण्यासाठी  नेमके मार्गदर्शन नव्हते. पुढे त्याला कळले की, त्याच्या गावाला आजोबांचा एक तानपुरा होता. तो त्याला खूप आवडायचा. त्यानंतर चांगल्या संगीताची त्याची आवड अजून वाढायला लागली. म्हणून दहावी नंतर मुकुंदाने किबोर्डचा क्लास लावला. पण ते वाद्य उत्तम वाजवता याव यासाठी फक्त क्लासवर अवलंबून चालणार नव्हते. घरी कीबोर्ड घेऊन रियाज महत्त्वाचा होता. पण कीबोर्डच्या किमती त्यावेळी साधरण १० ते १२ हजार असल्याने, तो विकत घेणे शक्य नव्हते. म्हणून किबोर्डचा विचार थांबवावा लागला.

                           पुढे, अकराव्या वर्गात असतांना त्याचा एक मित्र बासरी वाजवायचा. त्याचे बासरी वादन ऐकून लोक त्याचे कौतुक करायचे. मुकुंदालाही त्याची बासरी आवडायला लागली. आणि आपणही बासरी शिकावे, जेणेकरून शिक्षणाव्यतिरिक्त बासरी वादनामुळे लोक आपलीही प्रशंसा करतील आणि चांगल्या संगीताशी आपण परत जोडले जाऊ असे वाटू लागले. म्हणून त्याने त्या मित्राकडे बासरी शिकायला सुरुवात केली. पण गरज होती योग्य गुरूची..पण गुरू न मिळाल्याने तो तबला शिकायला गेला.

                        साधारण दोन तीन वर्षानंतर तबला शिकत असताना, नागपुरातले बासरी वादक श्री.प्रमोद देशमुख यांच्याशी त्याची ओळख झाली. सुरुवातीला त्यांनी त्याला एक रक्कम फी म्हणून सांगितली. जी मुकुन्दासाठी देणे कठीण होती, पण ती त्याने दोन महिने दिली. पण तिसऱ्या महिन्यापासून मुकुन्दाची इच्छाशक्ती पाहून आणि हा खरच शिकणारा विद्यार्थी आहे असे जाणवल्यामुळे श्री, देशमुख यांनी मुकुन्दाकडून फी घेण बंद केल. पण शिकवण तसच सुरु ठेवल. शिकवतांना त्यांनी मुकुंदाला रियाजासाठी पी.व्ही.सी. पाईपपासून तयार केलेली बासरी दिली.कारण त्यावेळी नागपुरात हवी तशी चांगली बासरी मिळत नव्हती. त्यासाठी मुंबई किंवा दिल्लीला जावे लागायचे. ज्या खूप महाग होत्या आणि फक्त बासरीसाठी मुंबई किंवा दिल्लीला जाणे त्यावेळी शक्य नव्हते. 


                   पुढे कॉलेजला गेल्यावर जेव्हा त्याला आणखी इतर स्वरांच्या बासऱ्यांची गरज भासू लागली तेंव्हा त्याने देशमुख सरांसोबत मिळून काही पी.व्ही.सी.पाईप घेतले आणि त्यावर प्रयोग करायला सुरुवात केली. बासरी शिकता शिकता ती तयार करण्याची खरी सुरुवात इथून झाली. त्यानंतर देशमुख सर त्यांच्या बासऱ्या जेव्हा आणायचे तेव्हा त्यात एखाद्या बासरीचा एखादा स्वर चढा असयाचा,किंवा कमी,उतरलेला असायचा. तेंव्हा तो स्वर का चढला असेल? का कमी लागतोय? सुरात का वाटत नाहीय? यावर,त्यांची आणि मुकुंदाची चर्चा  व्हायची. आणि त्यावर मुकुंदा हे नेमकं कशामुळे असेल याचे कारण शोधण्याचा आणि त्या कारणावर काही उपाय शोधता येईल का याचा विचार करायचा. तो त्यावर प्रयोग करून बघायचा. ह्यातूनच त्याला बासरी कशी बनवावी ? कशी असावी आणि असू नये? याचे प्राथमिक धडे मिळायला लागले. एखादी बासरी अशी आहे तर ती तशी का आहे? त्याचा व्यास किती असायला हवा होता? किंवा एखाद्या छीद्राची जागा नेमकी कुठे असयला पाहिजे होती आणि त्या छिद्रांमध्ये किती अंतर असाव, याबद्दल त्याला या अभ्यासातून प्राथमिक अंदाज यायला लागले. आणि बासरी शिकण्यासोबत ती तयार करण्यात त्याची रुची अधिक वाढू लागली.  

            यानंतर काही कालावधीने त्याची ओळख नागपूरचे प्रसिद्ध सेक्सोफोन आणि बासरी वादक श्री.प्रकाश खंडाळे सरांशी झाली. खंडाळे सरांचे कार्यक्रम देश विदेशात व्हयाचे. त्यामुळे ते बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जायचे. तेव्हा त्यांच्याकडून बासरीसाठी लगणारे बांबू आपल्याला मिळू शकेल असे मुकुंदाला वाटले..म्हणून त्याने सरांना बांबू आणायची विनंती केली. सरांनी त्याच्यासाठी कलकत्ता आणि भारतातल्या इतर काही ठिकाणाहून बांबू आणले. आणि त्याने या बांबूवर प्रयोग करायला सुरुवात केली. अर्थात या सर्व प्रक्रियेमध्ये फक्त छिद्र करणे आणि बासरी तयार झाली असे होत नाही. असे मुकुंदा सांगतो. एखाद्या स्वराची बासरी तयार करायची म्हणजे ब्लोईंगच्या जागेपासून पासून पहिल्या स्वराचे छिद्र किती अंतरावर असावे? दोन छिद्रांमध्ये किती अंतर असायला पहिजे? त्याचा व्यास किती असावा ?त्या विशिष्ट स्वराच्या बासरीचा जो अपेक्षित आवाज किंवा नाद आहे तो कसा मिळवता येईल..? एका स्वराहून दुसऱ्या स्वरावर जाताना फोर्स कसा असावा? यासाठी अभ्यास लागतो. हा अभ्यास मुकुंदा करू लागला..आणि सोबतच खंडाळे सरांकडे बासरीचे पुढचे धडे गिरवायला लागला. एका कसलेल्या रियाजी आणि व्यावसायिक बासरी वादकामध्ये आणि नवशिक्या वादकामधे काय फरक असतो, त्यांची वादनाची सवय कशी असते, अश्या अनेक बारीक सारीक पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मुकुंदाला सरांकडून शिकायला मिळाल्या. याचसोबत बासरी निर्मितीला प्रोत्साहनही सर देत असायचे.

Mukund-Lekurwale-All-Masters-


                    बासरी शिकणे आणि बासरी तयार करणे हे जरी मुकुंदाच्या डोक्यात चालले होते तरी, पुढे करियर म्हणून त्याने ग्राफिक डिझाईन करण्याचा विचार केला.तेव्हा त्यासाठी त्याला मुंबईला जायचे होते.पण मुंबईला जावे कुणाकडे आणि ग्राफिक डिझाईन कसे शिकता येईल असा प्रश्न होता. म्हणून मग खंडाळे सरांच्या मदतीने, त्यांचे मित्र मुंबईतील प्रसिद्ध बासरी वादक पं. रोणू मुजुमदार यांच्याकडे गेला. आणि त्यांचाकडे तो राहायला लागला..आणि पुढे रोणू मुजुमदार गुरुजींकडे तो गंडाबंध शिष्य झाला. सोबत ग्राफिक डिझाइनचे आणि अकाऊन्टचे शिक्षणही सुरु झाले. पण बासरी तयार करण्याचे काम इथे अजून त्याने  तसे सक्रीयरित्या सुरु केले नव्हते.ते फक्त त्याने त्याच्या पुरते मर्यादित ठेवले होते.कारण त्याने बासरी तयार करण्याला व्यवसाय म्हणून कधी पाहिले नव्हते. पण, जर काही बासऱ्या तयार असतील तर तो काही मोठ्या जाणत्या लोकांना दाखवायचा. त्यातून त्याला अजून योग्य अभिप्राय मिळायचे आणि कधी टीकाही व्हायची. पण मुकुंदा म्हणतो कि अभिप्रयासोबत टीकाही खूप महत्त्वाच्या होत्या..ज्यामुळे त्याला त्याच्या कामात सुधारणा करता आल्या.तो अजून कुठे कमी पडतोय आणि काय करायला हवे याचे अंदाज यायला लागले.

                        मुंबईतले शिक्षण झाल्यावर तो नागपूरला परत आला. एका मित्राकडे सकाळी ग्राफिक डिझाईनचे आणि संध्याकाळी अकाऊन्टचे क्लास घेऊन काम करायचा.आणि रात्री  बासरीचा रियाज करायचा .पण  या सगळ्यांपेक्षा आपण संगीत क्षेत्रात राहून काम करावे आणि त्यात नाव कमवावे असे त्याला वाटत होते. नागपुरात कार्यक्रमासाठी येणाऱ्या मोठ्या कलाकारांना तो आवर्जून भेटायचा आणि त्यांच्याशी बासरी आणि संगीत या विषयावर बोलायचा. अशातच एकदा त्याला त्याचे गुरु पं. रोणू  मुजुमदार यांचा फोन आला आणि त्याला त्यांनी मुंबईला येण्याचे आणि तिथे  Flute Making चे काम करण्याचे आमंत्रण दिले. नागपूरची सगळी काम सोडून तो तिथे मुंबईला गेला. आणि त्यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली Flute Making चे काम सुरु केले.

                     ह्या सगळ्यात , मुंबईची गर्दी , धावपळ मुकुंदाला जरा दगदगीची वाटू लागली.त्याने विचार केला की, हे काम आपण नागपूरला आपल्या घरून करावे.आणि ह्यालाच व्यवसाय म्हणून आता पुढे न्यावे. तेव्हा आपल्या गुरूंना सांगून त्याने थेट परत नागपूर गाठले. आणि नागपूरला आपले काम सुरु केले. सुरुवातीला काही दिवस थोडे कठीण गेले. पण नंतर ज्यांनी मुंबईला मुकुंदाचे काम पाहिले होते ती लोक त्याच्याकडून बासऱ्या पार्सलने मागवू लागली. आणि पुढच्या २ ते ३ वर्षात नागपुरातुनही लोक त्याच्याकडे बासरी खरेदीसाठी येऊ लागले. ह्या सगळ्यात त्याचे बासरी वादनही सुरु असायचे आणि दिग्गज आणि जाणत्या बासरी वादकांकडून मार्गर्शनही मिळायचे.

               बासरी आवडत नाही असा बहुतेक कुणी नसावा. पण एका बांबूच्या काठीचा बासरी म्हणून मान मिळवण्याचा प्रवास हा खूप खडतर असतो. एक Flute Maker म्हणून मुकुंदा सांगतो की, भारतात आसाम आणि दक्षिणेत निलाम्बर इथे बांबू मिळतात. तिथल्या जंगलात गवतासारखे ते वाढतात, त्याला तोडून त्याचे तुकडे करून ते सूक्ष्म निरीक्षण करून ते आणावे लागतात. त्यानंतर हिरव्या बांबूवर उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अश्या तीनही ऋतूंचा संस्कार व्हावा लागतो..हिरवे बांबू सुकून पिवळे व्हायला लागतात.त्यातही काही बांबू आणल्यानंतर किडी मुळे खराब होतात तेव्हा ते फेकून द्यावे लागतात. किंवा एखादी बासरी तयार झाल्यानंतर एखादे छिद्र १ m.m.ने जरी कमी जास्त झाले तर त्याचा आवाज बदलू शकतो व ती बासरी सुरात राहत नाही...तेव्हा त्याचा काही उपयोग नसतो. प्रत्येक स्वराच्या बासरीचा आकार, त्याचा व्यास, त्याची ठेवण ही वेगवेगळी असते.

              Flute Maker म्हणून मुकुंदाचा प्रवास जसा खडतर होता तसा तो जरा सुखदही आहे. कारण इथे तो फक्त बासरी वाजवणे किंवा ती तयार करणे इतकेच शिकला नाही, तर कुठल्या बासरी वादकाची काय सवय आहे,?त्याला कशी बासरी आवडते?बासरी वाजवतांना त्याच्या ओठांची ठेवण कशी असते? तो उजव्या हाताने बासरी वाजवतो कि डाव्या हाताने? आणि मग त्यासाठी त्या बासरीची संरचना कशी असावी ? अश्या अनेक बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास त्याने केला. आणि प्रत्येकाच्या लकबीनुसार बासऱ्या तयार करायचे कसब शिकून घेतले. म्हणजेच इथे Making सोबत मानसशास्त्राचा अभ्याससुद्धा तितकाच महत्त्वाचा होता. बासरीचा आवाज आणि सूर यासोबत ती सुंदर दिसावी यासाठी बासरीला धागे कुठल्या रंगाचे लावावे? तीला चकाकी येण्यासाठी काय करता येईल? यासाठी त्याचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे.


Mukund-Lekurwale-Maesroes-using-MukundLekurwaleFlute

                   एकेकाळी ‘त्या’ मुकुन्दाने आपल्या बासरीच्या आवाजाने सगळ्यांना मोहून टाकले होते तसे या मुकुंदाच्या बासरीने आज संगीत क्षेत्रातल्या अनेक दिग्गज आणि थोर बासरी वादकांना मोहिनी घातली आहे. त्याच्या बासरीतले Perfection अनेकांना त्याची बासरी घेण्यास प्रवृत्त करते. पद्मविभूषण  पं. हरिप्रसाद चौरासिया, त्याचे गुरु पं. रोणू मुजुमदार, पं. राकेश चौरासिया, पं.राजेंद्र कुळकर्णी, पं. अभय फगरे, संदीप कुळकर्णी, प्रकाश खंडाळे सर, विवेक सोनार, ए. आर. रहेमान यांचे बासरीवादक किरणकुमार, विजयकुमार, नेपोलियन सर, कमलाकरजी, निनाद मुळावकर, अनुपम वानखेडे, अश्या अनेक दिग्गजांना त्याची बासरी आवडते आणि त्यांच्या कार्यक्रमांत ते वाजवतात.

               

Pt.Hariprasad-Chaursiya-MukundLekurwaleFlute


                    एकदा मुकुंदाचे मित्र विवेक सोनार यांना पं.हरिप्रसाद चौरासिया यांच्यासाठी बासरी हवी होती..वेळ खूप कमी होता. तेव्हा त्यांनी मुकुंदाला ती तयार करायला लावली. अश्या वेळी निश्चितच त्याच्यावर दडपण होते.कारण आज बासरी साक्षात देवासाठी जाणार होती तेव्हा त्यात काही कमीजास्त झाले तर पुन्हा कधी संधी मिळणार नाही हे ही त्याला माहिती होते. पण त्याने सय्यमाने काम केले., तेव्हा पंडितजी बासरी कशी पकडतात,याचा अभ्यास केला. वय झाले असल्याने ओठांची पकड ढिली होते,त्यानुसार त्याने त्या बासऱ्या तयार केल्या. आणि लगेच मुंबईला पाठवल्या.दोनच दिवसात स्वतः पंडीतजींनी फोन करून मुकुंदाला बासरी आवडल्याचे सांगितले. त्यांनी दिलेली शाबासकी मी कधीच विसरणार नाही असे मुकुंदा नेहमी सांगतो.

                        Flute Making च्या क्षेत्रात आज खूप स्पर्धा वाढली आहे तरीही मी मुकुन्दाला कधी त्याच्या बासऱ्यांची इतरांसारखी सोशल मिडीयावर प्रसिद्धी करतांना पहिले नाही.त्याला ते आवडत नाही.इतरांनी केली तर ठीक पण तो स्वतःहून कधी करत नाही. दिवसाला फक्त ४ बासऱ्या झाल्या तरी चालतील पण त्या सुरेल आणि दर्जेदार व्हाव्या याकडे त्याचा कल जास्त असतो.  प्रत्येक काम नियोजन आणि विचार करून करणाऱ्या मुकुंदाला बासरीसोबत चांगल्या लेखकांचे लेखन आणि दर्जेदार साहित्याचीही खूप आवड आहे. आज मुकुन्दाकडे काही विद्यार्थी बासरी शिकतात. तो त्यांनाही आनंदाने शिकवतो आणि स्वतःचाही रियाज सातत्याने करतो.

            कधीकाळी फक्त संगीत क्षेत्रात आपणही काहीतरी करावे,जेणेकरून लोकांचे आपल्याकडे लक्ष राहील अशी छोटीशी इच्छा बाळगणाऱ्या मुकुंदाच्या बासऱ्या आज भारतासोबत अमेरिका,ऑस्ट्रेलिया,पाकिस्तान आणि जगभर इतर देशातही रोज कुरिअर केल्या जातात. आपण नेहमी कलाकाराच्या वादनाचे कौतुक करतो.पण एखादा कलाकर जे वाद्य वाजवतो त्याच्या मागे ते वाद्य तयार करणारे हात मात्र बऱ्याचदा दुर्लक्षित राहतात. मग ते कुठलेही वाद्य असो. एखादा कलाकर जसा रियाज करून आपल्या कलेला प्रगल्भ करतो तसेच हे वाद्य तयार करणारे सृजनात्मक हातही मोठेच असतात.कारण त्यामागेही एक कलाकार दडलेला असतो. माझ्या मते एखादे वाद्य वाजण्यापेक्षा जेव्हा ते बोलू लागते तेव्हा ते वाद्य तयार करणाऱ्या कलाकाराला खरा सम्मान मिळतो. आणि अश्या कलाकारांपुढे माझे कर नेहमी जुळतात.  

MUkund-Lekurwale-Flute-workshop




           

                                       


15 comments:

  1. क्या बात है अमोल दादा ❤️
    खूप छान व मुद्देसूद लिहिलंय❤️����

    ReplyDelete
  2. कमाल, अतिशय माहितीपूर्ण लेखन आहे, मुकुंद ची बासरी फार सुरेल वाजते, कलाकाराला आनंद देते, त्याच्या मेहनतीला , सृजनशीलतेला माझे वंदन.
    ज्योत्स्ना मुळावकर

    ReplyDelete
  3. Thanks for sharing this very inspiring story Amol .

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेखन..तुझ्यामुळेच मुकुंदजीना भेटू शकलो. अगदी यथायोग्य!

    ReplyDelete
  5. Kyaa baat!!
    Kalakaar ani lekhan donhihi uttam!!!

    ReplyDelete
  6. खूप सुंदर कार्य अणि त्या कार्याची मांडणी सुद्धा... 👍🏻

    ReplyDelete
  7. It's too inspiring Mukund Dada... उत्तम लिखाण.उत्तम मांडणी.

    ReplyDelete
  8. Instrument koi bhi ho use banana aur bajana dono hi adbhut kala hai. Adhiktar hum instrument bajane ko hi kala samjh baithate hai. Bahut achha laga ke aapne hume aise kalakar se milvaya jiski kala se hum anjaan the.

    ReplyDelete
  9. मुकुंद दादा... खूप प्रेरणादायी प्रवास आहे.
    आणि खूप छान शब्दात मांडलंय 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  10. खूप छान 👍👌👌

    ReplyDelete
  11. I appreciate the flute maker's hard efforts to attain perfection. I recall my mother who performed for over 40 years on AIR,Pune playing the instrument and that I had accompanied her to Amravati while I was very young in search of some good flutes. The factory there was then called ASARKAR BASARYANCHA KARKHANA.

    ReplyDelete
  12. Casino Delivers 10 Million In-Ways Cash Reward | JTM Hub
    Casino Delivers 10 Million In-Ways 계룡 출장샵 Cash Reward · A new 서산 출장마사지 partnership with PlayMGM 경기도 출장마사지 has led to 정읍 출장샵 a massive payout for 천안 출장샵 players who

    ReplyDelete

Do not Post any Abusive Content or word or Spam Links in Comment Box.