शिवबा हवे की जिजाऊ ?

शिवबा हवे की जिजाऊ ?

 


                     साधारण चौथ्या वर्गात असताना, इतिहासाचे पुस्तक हाती आले. शाळेचे नवे वर्ष अगदीच सुरु झाले होते. त्यावर्षी त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ असे चित्र होते. एका हातात तलवार, एका हातात घोड्याची  लगाम,मागे काही मावळे आणि निसर्गरम्य असा देखावा. पिळदार शरीरयष्टी , डोळ्यात करारीपणा, चेहऱ्यावर तेज, भरदार दाढी-मिश्या आणि डोळ्यासमोर एकच ध्येय ‘स्वराज्य’. त्या चित्राला राजा रवी वर्मा यांनी अप्रतिम रेखाटले होते.

             

शिवछत्रपती, शिवाजी महाराज
             आता पर्यंत शिवरायांबद्दल घरातल्या मोठ्यांकडून फक्त ऐकले होते, ते महाराज पहिल्यांदा डोळ्यांनी त्या चित्रात पाहिले. मन भरून आले होते आणि अभिमानही वाटला ,कारण ज्या शिवरायांनी या महाराष्ट्राला राखले ,स्वराज्य उभे  केले होते. त्या पावन भूमीत जन्म व्हावा यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्ट असूच शकत नव्हती. खूप कौतुक वाटायचे त्यावेळी शिवाजी महाराज आणि मावळ्यांबद्दल ऐकून. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबद्दल ऐकताना एक स्फुरण चढायचे. सुरुवातीला इतिहास म्हणजे कंटाळवाणा विषय वाटला होता,पण जसजसे महाराज आणि त्यांच्या आयुष्याबद्दल कळायला लागले तसतसा महाराजांबद्दल आदर वाढला. आणि इतिहासात मन रमायला लागले.  इतिहास असा घोकंपट्टी करून लक्षात राहत नाही तर त्यासाठी इतिहासातलं प्रत्येक पात्र तुम्हाला जगावं लागत हे त्या वरून लक्षात आलं.

                छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक तेज, एक चैतन्य, एक विचार, एक शूर योद्धा, रयतेचा एक महान राजा, उत्तम व्यवस्थापनेच एक जिवंत उदाहरण, शब्द कमी पडतील, सगळे शब्दकोश संपतील महाराजांबद्दल वर्णन करायला. इतकं मोठं आणि बहुआयामी आहे शिवचरित्र. नियतीने अश्या थोर राजाला खूप कमी आयुष्य दिलं, पण कमी आयुष्यात सुद्धा समृद्धपणे कसं जगावं आणि जगायला शिकवावं हे महाराजांच्या जीवन प्रवासातून आज ४०० वर्षानंतरही शिकता येतं. त्यानंतर जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज हा विषय यायचा तेव्हा तेव्हा आपण हा इतिहास फक्त शेवटच्या परीक्षेत पास होण्यासाठी शिकतोय अस कधी वाटलच नाही. जेव्हा जेव्हा जिथे मिळेल तशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायला लागलो.

आऊसाहेब जिजाऊ आणि शिवबा राजे

              नंतर नंतर ते जरा कमी झालं कारण कॉलेज सुरु झालं, त्याच एक वेगळ वातावरण होत.आणि याच दरम्यान हाती आली, रणजित देसाई यांची कादंबरी“ श्रीमान योगी”. साधारण १२०० पानांची हि कादंबरी पाहून जरा मनात विचार आला की कधी वाचणार ही मी..? कितीमोठी आहे ? यातलं सगळं जर टीव्ही वर किंवा सिनेमात पाहायला मिळाला तर किती बर होईल ना?आणि खरच असे झाले, महाराजांवर आज पर्यंत अनेक सिनेमे झाले, हिंदीत मालिकाही झाल्या. पण २००८ साली डॉ. अमोल कोल्हे यांची ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका आली आणि आनंदाला पारच राहिला नाही..कारण मी मुळातच  फिल्म मिडीयाचा विद्यार्थी. तेव्हा दृक्श्राव्य माध्यम हे जास्त जवळच वाटतं मला. वाचताना आपण एखादी  गोष्ट फक्त मनात रंगवू शकतो, कल्पनेच्या रंगांनी ते चित्र ते मानसपटलावर रेखाटू शकतो पण हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित असतं. इतरांना त्याचा आनंद घेता येत नाही. म्हणून जेव्हा आपण बालपणी वाचलेली एखादी गोष्ट टीव्ही किंवा मोठ्या पडद्यावर प्रत्यक्ष बघतो त्याचा आनंद काही औरच असतो.ते जास्त जवळचे वाटते.

           डॉ. अमोल कोल्हे यांनी रंगवलेली महाराजांची भूमिका हि डोळ्याच पारणं फेडणारी होती. किती तरी प्रसंगात तर डोळे भरून यायचे. इतकं सुंदर दिग्दर्शन आणि सादरीकरण होतं त्याच.ते पाहत असताना पुन्हा एकदा विचार आला हे जर इतकं सुंदर आहे तर श्रीमान योगी ही कादंबरी किती सुंदर असेल. आणि बघण्यासोबत वाचनाचा प्रवास सुरु झाला. श्रीमान योगी वाचत असताना आणि राजा शिवछत्रपती पाहत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल खूप वाचतो, बोलतो, ऐकतो, पण या सगळ्याच्या मागचा खरा सूत्रधार कोण हे जाणून घेण्याचा शोधच घेत नाही. लहानपणी फार तर सातवीत किंवा आठवीत असताना आजीच्या तोंडून एक वाक्य ऐकण्यात आल होतं ‘शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी’ आणि मनात प्रश्न आला की, का शिवाजी जन्मावा शेजारच्या घरी ? आपल्या घरी जन्म का घेऊ नये ? प्रश्न तसा सोपा होता. पण म्हणतात ना  की जे सोपं असतं तेच खूप कठीण असतं. 

राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा
          आता खरा विषय इथे सुरु होतो, शिवाजी महाराज प्रत्येक घरात जन्म घेऊ शकतात. पण जन्म देणारी आई ही आधी जिजाऊ व्हावी लागते. शिवाजी महाराज यांच्यापुढे आज अवघा महाराष्ट्र नतमस्तक होतो, संपुर्ण देशातल्या आणि देशाबाहेर सातासमुद्रापार महाराज लोकांच्या मनावर आजही अधीराज्य करताहेत.  व्हिएतनाम सारखा देश आज त्यांच्या अभ्यासक्रमात महाराजांविषयी आणि त्यांच्या व्यवस्थापनेविषयी  शिकवतो. याचाच अर्थ महाराज हा एक असा विचार आहे जो सर्वदूर पसरलाय...आपण साधारणतः जेव्हा महाराजांबद्दल वाचतो, ऐकतो, तेव्हा त्यांच्या कार्यासमोर नतमस्तक होतो, त्यांची वाह वाह करतो, त्यांच्याबद्दल अपार आदर वाटतो , असा राजा पुन्हा होणे नाही असे आपल्या तोंडातून अनायास निघते पण सहजच हे म्हणत नाही की शिवाजी महाराज माझ्या घरात जन्म घ्यावे..कारण आज आपल्या पुढे असलेले सिंहासनाधिष्ट महाराज आणि बालपणीचे शिवबा यातला जो कणखर संघर्ष आहे तो आपल्याला नको असतो.. बाल शिवबा जन्म घेतीलही...पण तुमची जिजाऊ व्हायची तयारी आहे का ?...कारण शिवाजी घडण्यासाठी आधी आजच्या जिजाऊला दूरदृष्टीकोन ठेवणे, खंबीर होण, ध्येय मोठ ठेवणे, मातृभूमी आणि तीच संरक्षण याची जाणीव होण, आणि त्यासाठी लागणारा मनातला अग्नी सातत्यानं प्रज्वलित ठेवणं खूप गरजेच आहे. कारण शिवबा घडवायचे असतील तर आजच्या प्रत्येक आईला आधी जिजाऊ होण खूप गरजेच आहे.

                     शिवबा घडवायचे म्हणजे नेमके काय? तर फक्त हातात तलवार आणि सतत लढाई? नाही.....हातात तलवार घेऊन लढणारे शिवबा एकवेळ सहज कळतीलही..पण खरे शिवाजी महाराज समजणे हे साधे साधेसुधे नव्हे. त्यासाठी आधी आपल्या डोक्यातली हाती तलवार घेऊन स्वारीवर निघालेली त्यांची प्रतीमा थोडावेळ बाजूला ठेवणे गरजेचे आहे आणि वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे बघणे खूप गरजेचे आहे....आज परिस्थिती बदलली आहे. रामायण, महाभारत, थोर विचारवंताचे लेखन, कादंबऱ्या, ग्रंथ, आपल्या देशातल्या अनेक ऐतिहासिक पात्रांची ओळख करून देणे हे आपल्याला नकोसे वाटते. त्या वीर यशोगाथा सांगणे ,त्यांच्या कथा सांगणे,आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, रोजच्या आयुष्यातले दैनदिन संस्कार मुलांना देणे, आज आजची आई विसरलीच आहे..माझा कुठल्याही आईला तिच्या विचारांना विरोध नाही.कुठल्याही आईला बोल लावण्याइतकी माझी कुवतही नाही. पण एक सामान्य नियम आहे सृष्टीचा, कि जेव्हा एखादं लहान बाळ जन्म घेतो, तेव्हा  तो इतरांपेक्षा आईशी जास्त जुळलेला असतो. त्याच्या भोवती सगळे असतात, पण वयाची काही वर्ष तरी तो आईवरच अवलंबून असतो. तिच्याशिवाय त्याच दुसरं विश्वच नसतं. मग अश्यावेळी आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून जगणारी आई व्हायचं कि कणखर आणि निर्धाराने पक्की अशी जिजाऊ व्हायचं ते त्या आईनेच ठरवायला हवं. कारण तेव्हा परकीय शत्रू हे स्थूल स्वरुपात स्पष्ट दिसणारे होते, पण आज हे विकृत शत्रू विचारांच्या रूपाने फोफावत चालले आहेत. अश्यावेळी त्यांना शोधून जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला शिवबाचे स्वरूप द्यायलाच हवे.

राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा

        त्यावेळी रामायण महाभारतातुन आणि इतर अत्यंत उपयुक्त ग्रंथ आणि गोष्टींमधून जिजाऊने आपल्या शिवबांना राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शौर्य , पराक्रम, न्याय आणि नितीमत्ता असे महत्त्वाचे धडे दिले तर इतिहासात घडलेल्या अनेक गोष्टीतून या परकीयांशी लढताना काय चूक करू नये हे शिकवले. म्हणजेच  काय तर सोप्या शब्दात सांगायचे तर कुठलेही कार्य करायच्या आधी व्यवस्थापन चोख असणे गरजेचे आहे हे जीजाउंनी शिकवले. काही लोक म्हणतीलही कि त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, पण आज मग वेगळं आहे? फरक फक्त इतकाच आहे की, शत्रू त्यावेळी समोर स्पष्ट दिसायचा आता तो विकृत स्वरूप घेऊन विचारांच्या खोलीत घर करून राहतोय. मग अश्या शत्रूशी लढायला आपण आपल्या मुलांना कधी शिकवणार? जरा गार हवा आली थंडी वाजेल, उन्ह वाढलं अंग भाजेल, पाऊस आला , भिजशील आणि सर्दी होऊन ताप येईल. अश्या भीतीच्या वातावरणात आपण सतत मुलांना कमकुवत आणि कमजोर करत असतो. त्यांना आलेल्या परिस्थितीशी तोंड द्यायला शिकवतच नाही..तो अजून लहान आहे म्हणून सतत त्याला सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवतो, आणि मग जेव्हा वेळ येते एकट्याने लढायची तेव्हा मात्र त्याला अश्या आधाराची आणि कुबड्यांची गरज सतत भासत असते. निसर्गापासून जितकं मुलांना दूर ठेवाल तितकी मुलं शारीरिक आणि बौद्धिक रूपाने कमजोर होतील.

                जिजाऊ मासाहेबांनी जर शिवाजी महाराजांना अशीच बंधन घातली असती, हे करू नको, ते करू नको,इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, तिथे थंडी वाटेल,सर्दी होईल,ताप येईल, तर आज छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक साधे राजे असते. आणि स्वराज्य हा शहाजी महाराज साहेबांचा विचार तिथेच संपला असता. शिवबा मातीत खेलेले, उन्ह वारा पावसात रमले, म्हणून आज राजे ४०० वर्षानंतरही लक्षात आहेत, आपणच आज आपल्या संस्कृतीला दूर सारून पाश्चात्य संस्कृतीच्यामागे इतके आंधळे झालो आहोत की आपल्याला कळत नाहीय की आपणच आपले घर एखाद्या भुंग्यासारखे पोखरतोय.

Image curtsy- Nilesh Auti

               निसर्गाने प्रत्येक स्त्रीला एक विशिष्ट शक्ती दिली आहे. आणि त्यातल्या त्यात  सर्वोच्च स्थानावर असेलला आई होण्याचा बहुमान निसर्गाने तिला बहाल केलाय. असे म्हणतात की ज्या घरात आई ही खंबीर, कणखर, संस्कार जाणणारी आणि संस्कार देणारी असेल त्या घराच सोन होत. मग हीच आई आपल्या मुलांच्या सुरुवातीच्या काळातली गुरु असते..म्हणून आई होताना सामान्य आई होण्यापेक्षा ती आई जर  जिजाई झाली तर शेजारच्याच्या घरात जन्म घेणारे शिवबा नक्की आपल्या घरात जन्म घेतील, प्रत्येक घरात जन्म घेतील .कारण राजमाता जिजाऊने जे शिवबा घडवले ते फक्त व्यक्तिमत्व नव्हतं तर तो एक विचार होता.  महाराज एक नव्हते तर महाराजांचा प्रत्येक मावळा हा शिवस्वरूप होता..कारण छत्रपती शिवाजी हा विचार एका व्यक्तीपुरताच कसा सिमीत राहू शकतो ना ? म्हणून वाटते की, शिवाजी आता शेजारच्याच्या नाही तर प्रत्येक घरात जन्म घ्यायची वेळ आलीय. पण त्याआधी  प्रत्येक घरातल्या आईने जिजाऊ व्हायची वेळ आलीय. कारण जिथे जिजाऊ असतील तिथे शिवबा नक्की जन्म घेतीलच. आणि शिवबा असेल  तिथे स्वराज्य नक्की असेल.

आजची आई जिजाऊ आणि बाळ शिवबा प्रतीकात्मक चित्र
Art by - Vikas Surwase

 

 

 

               

 

5 comments:

 1. खरंच अमोल..
  आज इतिहासावरुन शहाणं होणं अत्यावश्यक आहे. शोकांतिका हीच आहे की, आपण इतके स्वार्थांध झालोत की प.पू.महाराज, माँसाहेब, त्याचं नातं, संस्कार आणि राष्ट्राभिमान सारं नजरेत नाही येत.
  छान मांडलस..

  ReplyDelete
 2. अमोल सर,
  खरच खूपच सुंदर लेख आहे, खूप अभ्यासपूर्ण लेखन आहे. आणि मला आर्ट ची संधी दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  ReplyDelete
 3. Kharch Shivaji Maharaj yanchi kalpana jijau shivaye purna houch shakat naahi. Khup chhan chitran.

  ReplyDelete
 4. सुंदर आणि सुस्पष्ट विचार
  शिवबा जन्माला येण्यासाठी आधी जिजामाता घडवण्याची गरज आहे हे अधोरेखित करणारा लेख

  ReplyDelete
 5. Aapka samjhane ka tareeka kaafi badiya hai

  ReplyDelete

Do not Post any Abusive Content or word or Spam Links in Comment Box.