थोडा है थोड़ेकी जरुरत है.................

|| थोडा है थोडेकी जरुरत है......||

   


lal Bahadur Shastri Vidyalay, Umred.                                                      

                                                           नेटके लिहिता येना |

    वाचिता चुकतो सदा |

   अर्थ तो सांगता येना |

    बुद्धी दे रघुनायका  ||

 

                   समर्थ रामदास स्वामींच्या करुणाष्टकातल्या या चार ओळींचा प्रत्यय आज सारखा येतोय. कारण ज्या व्यक्तीबद्दल आज लिहायचं आहे, त्या व्यक्तीबद्दल लिहितांना सुरुवात कुठून आणि कशी करावी हेच समजत नव्हते. प्रयत्न खूप केला, सुरुवात अशी करावी का तशी करावी? सुरुवात करावी तर शब्द थिटे पडत होते. मन अत्यंत अस्वस्थ व्हायला लागल होते, सहज म्हणून हे करुणाष्टक ऐकताना हे शब्द कानी पडले अन ठरले कि याच शब्दांनी सुरुवात करावी. कारण ज्यांच्याबद्दल लिहायचंय त्याचं कार्य,त्याचा प्रवास इतका अफाट आणि प्रेरणादायी आहे की, लिहितांना शब्दांनी पूर्ण न्याय द्यायला हवा असे सतत वाटत होते. 

       डॉ. चक्रधर नामदेवराव ठवकर...... यांची माझी भेट अनाहूतपणे झाली ती मुंबईत, संजय गायकवाड, या नाट्यवेड्या माणसामुळे. ते शाळेच्या कामासाठी मुंबईला आले होते. संजू दादांनी माझी भेट चक्रधर दादांशी घालून दिली, त्या काही दिवसात मला चक्रधर दादांना जवळून अनुभवता आले. अश्या महान व्यक्तीशी ओळख करून दिल्याबद्दल संजू दादांचे आभार मानायला पाहिजे.

Shri. Chkradhar Thavkar, Principle.

                 शाळा...मराठी शाळा...सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. ही शाळा  मोठी झाली पाहिजे, ती टिकली पाहिजे, आणि त्या शाळेतून ज्ञानाने ओतप्रोत अश्या अनमोल हिऱ्यांची निर्मिती झाली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रात या मराठी शाळेकडे प्रत्येकाने सन्मानाने पाहिले हवे या ध्यासाने झपाटलेल्या आणि त्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून सतत मेहनत घेणाऱ्या एका अवलियाची आणि ‘त्या’ शाळेची  ही प्रेरणादायी गोष्ट.

                   मराठी शाळा म्हटल की , सध्या तरी डोळ्यासमोर येते, एक पडकी किंवा रंग उडालेली, कौलारू ,साफसफाई नसलेली वास्तू. जीथे काही मोजके शिक्षक आहेत, आणि बोटावर मोजता यावी इतकी मुलं. ज्या महारष्ट्रात ज्ञानेश्वरांनी मराठीत ज्ञानेश्वरी लिहून तिचा सन्मान केला ,चक्रधर स्वामींच्या लीळांवर आधारित, मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ लीळाचरित्र पं. म्हाइंभटांनी लिहिला, मराठीतले आद्य कवी मुकुंदराजांनी जीथे त्यांचा आद्यग्रंथ लिहिला, मराठी भाषेची व्याप्ती सांगणाऱ्या आणि त्याचा झेंडा अटकेपार नेणारे अनेक मराठी लेखक,कवी आणि संतकवी जिथे जन्माला आले , ज्या मराठीचे गोडवे गाताना ही जीभ अजूनही थकत नाही आणि जिची व्याप्ती इतकी मोठी आहे की, ती समजून घ्यायला आणि अंगात ,मनात भीनवायला जन्मही कमी पडतो,आणि शिवरायांच्या या महाराष्ट्रात मराठी शाळेला आणि मराठीला असे दिवस का यावे ? मग अश्या परिस्थितीत मराठी शाळा टिकतील कश्या, अन टिकल्या तर नव्या उमेदीने पुढे येतील कश्या ? असे अनेक प्रश्न मनात ठेवून  प्रत्येक श्वास घेणारे........

डॉ. चक्रधर नामदेवराव ठवकर.

             नागपूर जील्ह्यातलं उमरेड गाव. उमरेडच्या जवळ शेती आणि हिरव्या गार निसर्गाने व्यापलेलं बाम्हणी गाव. गावाची लोकसंख्या अगदीच मोजकी. साधारण १९२८ ला स्थापन झालेली जिल्हा परिषदेची एक शाळा या गावात होती.पण चौथी पर्यंतचीच मर्यादा शाळेला होती. पुढच्या शिक्षणासाठी मुलांना बाहेर गावी किवा शहरात दूर जाव लागायचं. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन १९७० साली नामदेवराव ठवकर (डॉ. चक्रधर ठवकर यांचे वडील) यांनी माध्यमिक शाळा इथे सुरु केली. आणि इथून सुरु झाला “लाल बहाद्दूर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, बाम्हणी चा” प्रवास.

lal Bahdur Vidyalay Umred.

                        या शाळेत अनेक अनेक विद्यार्थी घडले, तसेच डॉक्टरही इथेच शिकले, आणि याच शाळेत त्यांनी सन २००० साली ११वी आणि १२वी साठी कनिष्ठ व्याख्याता म्हणून पदभार स्वीकरला, नोकरी लागली,पगार मिळेल यापेक्षाही त्यावेळी मराठी शाळांना लागलेली उतरती कळा आणि कॉन्व्हेंट आणि इंग्रजी शाळांचा वाढता प्रभाव हा त्यांच्या पुढचा मोठा प्रश्न होता. २०१० साली चक्रधर ठवकर हे या शाळेचे मुख्याध्यापक झाले. पण २००० ते २०१० या वर्षातला काळ त्यांच्यासाठी आणि शाळेसाठी सोपा नव्हता. आव्हानं खूप मोठी  होती. शाळेत जेव्हा व्याख्याते म्हणून ते रुजू झाले तेव्हा इंग्रजी शाळांबरोबर मराठी शाळेची   स्पर्धा , सचिव या नात्याने अस्तित्व धोक्यात असल्याची जाणीव सतत होत रहाणे, शाळा  सुरु रहावी यासाठी लागणारे विद्यार्थी कमी असणे , अभ्यासक्रमात कौशल्याचा अभाव ,मराठी शाळेबद्दल पालकांची उदासीनता { जी आजही आहे आणि त्याच स्वरूप मोठ झाल आहे) आणि मराठी शाळांबद्दल शासनाची धरसोड वृत्ती असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे होते. अश्या अनेक बाबींनी ह्या शाळा मरणाच्या दारात उभ्या आहेत, त्या कश्या सावरायच्या? डौलानं पुन्हा उभ्या  करायच्या हा प्रश्न कायम  असायचा. पण हार न मानता त्यांनी कामाला सुरुवात केली.आणि हळू हळू प्रयोगाला सुरुवात झाली.

              बाम्हणीच्या आजूबाजूला असलेल्या गावातील गरीब शेतकरी आणि शेतमजुरांना संपर्क करायला सुरुवात झाली. तसा बऱ्याच पालकांचा संपर्क आधीपासूनच होता, फक्त त्याला विश्वासाच रूप द्यायला डॉक्टरांनी सुरुवात केली. आणि त्यांच्या पाल्यातील चांगले गुण ओळखून त्यांना त्याच्याकडे डोळसपणे पहायला लावले. हे करत असतांना त्यांच्यासाठी शिक्षण किती महत्वाचे आहे हे सांगितल्या गेले आणि त्यात आर्थिक विवंचना आड येणार नाही याची काळजी घेतल्या गेली. चक्रधर ठवकर स्वतः गावागावात फिरून शिक्षण आणि शाळेची महती लोकांपर्यंत पोहोचवू लागले. शाळेत मुलांना मोफत प्रवेश देण्यात आलेत, आजही नवीन विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो.  चक्रधर दादा हे स्वतः त्याच गावाचे असल्याने आणि ५०% शिक्षक शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने लोकांमध्ये विश्वास आधीच होता.

             २०१० साली जेव्हा डॉ. चक्रधर ठवकर शाळेचे मुख्याध्यापक झाले, तेव्हा त्या पदाने अनेक स्वप्न, आव्हानं त्यांच्या पुढे उभी केली. शाळेच्या बदलला आणि ती अद्ययावत करायला ते झपाटल्यासारखे कामाला लागले. यात त्यांना नक्कीच घरच्यांची अनेक मित्र आणि सहकाऱ्यांची नेहमी मदत मिळाली. शाळेसाठीच आयुष्य आता खर्ची घालायचे असे असताना...ह्या सगळ्यात त्यांना सोबत होती ती त्यांची पत्नी, आणि आमच्या विद्या वाहिनी. इथे हे खऱ्या अर्थाने म्हणता येईल की,डॉक्टरांना विद्या कि फक्त शाळेत किंवा कॉलेजमधेच मिळाली असे नाहीतर तर आयुष्याच्या शाळेत सुद्धा मिळाली. शाळेतल्या विद्येने त्यांना पुढे जगायचे कसे शिकवले तर पत्नीरूपी विद्येने जगतांना साथ करत, शाळेच्या स्वप्नपूर्तीसाठी मदतीचे वचन दिले. विद्या वाहिनीही त्या शाळेत शिक्षिका म्हणुन लागल्या. शाळेसाठी काम करतांना आर्थिक अडचणी पण येत होत्या, ते म्हणतात ना की, सगळी सोंग घेता येतात पण पैशाच सोंग नाही घेता येत. अश्या वेळी ठरले की, एकाने घर सांभाळायचे आणि एकाने शाळा. खरतर हा निर्णय  सोपा मुळीच नव्हता, पण वहिनीने सहज होकार दिला. डॉ. चक्रधर ठवकर म्हणतात, “हि विद्या माझ्या पाठीशी कायम खंबीर उभी असते.”   जशी त्यांची ताई कायम असायची...............

Lal Bahdur Shastri Vidyalay Umred Events.

                  छत्रपती शिवाजी महाराज, वडील आणि मोठे बंधू  हे डॉक्टरांसाठी नेहमी आधार राहिलेत आणि आहेत. लेखक, कवी गुलजार साहेब, चक्रधर ठवकर साहेबांचे प्रेरणास्थान. ज्याचा उपयोग त्यांना शाळेत बदलाव करतांना खूप झाला. त्यांनी  २०१२ पासून शाळेतल्या शैक्षणिक, सांस्कृतिक , क्रीडात्मक आणि कलात्मक विषयांचा आधार घेऊन  एक सुंदर उपक्रम सुरु केला, ज्याला नाव देण्यात आले “ थोडा है थोडेकी जरुरत है.....”  याच काळात त्यांनी एम ओ टी नावाच एक ट्रेनिंग केल, आणि शाळेच्या बदलाला एक निश्चित मार्ग मिळाला. सातारा जिल्ह्यातल्या कुंठे बीटा इथल्या जिल्हा परिषद शाळेतील प्रतिभा भराडे या शिक्षिकेने बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात केली असे त्यांना कळले, माध्यमिक शाळा यापासून खरतर खूप दूर होत्या. तरी माध्यमिक शाळा असूनही चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडाळी बिटला तत्कालीन उपशिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांना आणि शाळेच्या सर्व शिक्षकांना  घेऊन  चक्रधर ठवकर यांनी भेट दिली आणि सर्व प्रक्रिया समजून घेतली..अडचणी त्यातही आल्या पण सक्षमपणे त्यांनी त्या पार केल्या. त्या प्रक्रियेतले सगळे उपयोगाचे नव्हते तरी नकारात्मक विचार न कारता  जे आवश्यक आहे तेवढे घेऊन आणि त्यात थोड्या सुधारणा करून  त्यांनी शाळेच्या बदलाला सुरुवात केली.

                शाळेची वर्गवारी केली, गुणवत्तेनुसार मुलांचे रिपोर्ट कार्ड तयार केले, शाळेचे टेरेस  कलात्मक पद्धतीने, मुलांचा खेळता खेळता अभ्यास व्हावा या हेतूने रंगवून घेतले. निश्चितच रंगवणारे बाहेरचे कसे असतील? शाळेच्या शिक्षकांनीच हि कलात्मकता  दाखवली. आणि त्यातूनच एका नव्या कल्पनेचा उदय झाला. सर्व भाषा, गणित,विज्ञान अश्या कृतीतून खेळत आणि मुक्तपणे मुलांना शिकण्याची नवीन पद्धत अवगत करूनदेता आली. मुले रेंगाळत बसत शिकण्यापेक्षा आता टेरेसवर त्या तासाला खेळत शिकायला लागली. नक्कीच याचा परिणाम उत्तम दिसून आला.मुले आवडीने शिकू लागली. त्यामुळे मुलांच्या सक्तीचा आणि मोफत शिक्षण कायदा २००९ अंतर्गत वयानुसार प्रवेश मिळण्याच्या अधिकारानुसार, बाम्हणीतल्या आणि बाम्हणीच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना सरळ ५वी आणि  ६वीत प्रवेश देण्यात आला. ज्यांना साधी बाराखडीही  येत नव्हती, आकडे कठीण वाटायचे त्यांनी सर्व भाषा आणि गणित त्यांच्या क्षमतेनुसार अवगत केले.याचे रीतसर निरीक्षण उपशिक्षण अधिकारी यांनी केले.


School Premice.

School Premice.
            एवढ्यावर थांबुन चालणार नव्हते. याच्या पुढची पायरी म्हणजे शाळा डिजिटलाइज झाली आणि विद्यार्थी आता स्वतः शैक्षणिक साधने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून शिकतात. या संपूर्ण  प्रक्रियेला ज्ञानरचनावाद असे म्हणतात. ज्ञानरचनावादाचा संपूर्ण उपयोग करून, हा प्रयोग यशस्वीपणे पूर्ण करणारी लाल बहादूर शास्त्री विद्यालय ही नागपूर जिल्ह्यातली एकमेव शाळा ठरली. याच सोबत दादांनी राबवलेला सगळ्या विषयांच्या प्रयोगशाळेचा उपक्रम अगदी यशस्वी ठरला. शाळेत प्रयोगशाळा हवी,,पण ती फक्त विज्ञान किवा कम्प्युटरची नको,,तर भाषा , कला , इतिहास, भूगोल, यांची प्रयोगशाळा सुरु करणात आली. मुलांना वर्गात न शिकवता या प्रयोगशाळेत शिकवण्यात येते. यामागे त्यांची, कक्षेचा भेदभाव न ठेवता, सगळ्यांनी मित्र म्हणू एकत्र येऊन शिकावे आणि शिकतांना फक्त शिक्षकांवर अवलंबून न राहता मित्रत्वाच्या भावनेनी एकसाथ शिकावे अशी इच्छा आहे. हाही प्रयोग यशस्वी पार पडला.. विद्यार्थ्यांचे निकाल १०० टक्क्यांवर  जाऊ लागले..हा प्रयोग पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यातल्या  आणि जिल्ह्याबाहेरच्या जवळपास ७०० चे वर शाळांनी भेटी दिल्या. तर साधारण ५५० मुख्याध्यापकांची सभा ज्ञानरचनावाद समजून घेण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी  श्री. पटवे साहेबांनी भरवली.
School Event.

               लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय, डॉ.चक्रधर ठवकर आणि शाळेचे विद्यार्थी आता त्यांच्यासाठी कुठल्याही रोल मॉडेल पेक्षा कमी नाहीत.शेतकऱ्यांची ही मुलं ज्यांनी शहर कधी बघितले नव्हते, ती जगाकडे पाठ करून उभी राहण्यापेक्षा ,जगाकडे डोळसपणे पाहण्यासाठी सज्ज झाली होती. त्यांना एक नवी दृष्टी लाभली होती.आणि ती बहाल करणारे होते, डॉ. चक्रधर ठवकर आणि त्यांचे सर्व सहकारी.  थोडा है थोडे कि जरुरत है” या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात चांगले बदल व्हायला लागले आणि  मुले शैक्षणीक, सामाजिक, कलाक्षेत्र , पर्यावरण , सांस्कृतिक कार्यक्रम  अश्या सर्व क्षेत्रात  अग्रेसर राहायला लागली.  स्वच्छता अभियानात केलेल्या विशेष कामगिरीसाठी शाळेला युनेस्को क्लबचे मान्यता पत्र मिळाले. शहरापासून दूर असलेल्या,उमरेड गावाच्याही पुढे एका छोट्याश्या गावात असलेल्या पण या अद्ययावत शाळेसाठी ही खूप मोठी गोष्ट होती.

            ग्रामीण भागात अपवाद किंवा कमतरता असलेली एक गोष्ट या शाळेनी जगली..ती म्हणजे नाटक...नाटक अभिनयाचा गंधही नसलेली मुल आता उतरली ती बालराज्य नाट्यस्पर्धेत. चक्रधर दादा सांगतात,  पहिल्या बालनाटकाची तालीम त्यांच्या मुलांनी एक वर्ग खोलीत, लाईट, रंगमंच, नेपथ्य नसतानाही, आणि आर्थिक अडचणी असताना, केली. आणि हे सगळे होऊ शकले ते , फक्त नाट्य लेखक आणी दिग्दर्शक संजय गायकवाड यांच्या जिद्दीमुळे,शिस्तीमुळे आणि मुलांच्या मेहनतीमुळे. कधी नागपूर शहर न  पाहिलेल्या ५ वीच्या मुलांनी पोष्टर हे नाटक नागपुरात पहिल्यांदा सादर केल. बक्षीस नाही लागल पण प्रयोग मात्र दखलपात्र झाला. आणि पुढच्याच वर्षी याच बालनाट्याने  आणि मुलांच्या अभिनयाने विदर्भात पहिले बक्षीस घेतले...आणि थेट मुंबई गाठली. या नाटकाचे १५ प्रयोग विविध ठिकाणी झाले.आणि पुढे सलग 3 वर्ष लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाची बाल नाट्य विदर्भातून पहिल्या क्रमांकावर राहिली. पोष्टर , बंदगली, अश्या एका शनिवारी ,सतरंगी बायोस्कोप अश्या बालनाट्याची चळवळच सुरु झाली.  यात अडचणी आल्या नाहीत असे नव्हते.अडचणींशिवाय मिळणाऱ्या यशाचे  मोलही कळत नाही. बंदगली या बालनाट्याच्या वेळी अंतिम फेरीसाठी ,मुंबईला जायचे होते.पण आरक्षण न मिळाल्याने स्पर्धा सोडावी की काय असा विचार पण आला..पण हार न मानता शाळेच्या विद्यार्थ्यांना सगळ्या टीमसोबत चक्रधर ठवकर यांनी ९०० किमीचा प्रवास करत शाळेच्या विंगर बसने मुंबईला पाठवले. यावेळी ते म्हणतात की, “ जिंकणे , हारणे याहीपेक्षा लढणे हे महत्त्वाचे,आणि एकही मावळा न गमावता,जे पहिले छत्रपती सांगतात.”...यानंतर या टीमने कधी मागे वळून पहिले नाही. अश्या एका शनिवारी बालनाट्याचे प्रयोग त्यानंतर कोल्हपुर इचलकरंजी अश्या बऱ्याच ठिकाणी झालेत. ज्ञानरचनावादाचा हा प्रयोग शिक्षणासोबत नाटकातही यशस्वी झाला.

Theater Momnets of Lal Bahadur Shastri Vidyalay, Umred.
                           हे सगळे शाळेसाठी सुरु असताना , चक्रधर दादा स्वस्थ बसणाऱ्यातले नव्हते.
या सगळ्या धावपळीत त्यांनी महानुभावांच्या स्थळभाष्याचा चिकित्सक अभ्यास हा विषय घेऊन,  PhD. करायचे ठरवले. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून फेबुवारी २०२० साली PhD पूर्ण केली.  २१.०२.२०२० या दिवशी त्यांना त्यांच्या सखोल अभ्यास करून जमा केलेल्या थेसिस साठी नागपूर विद्यापीठाकडून  डॉक्टर हि पदवी बहाल करण्यात आली. १ जुलै १९७० साली स्थापना झालेल्या लाल बहादूर माध्यमिक विद्यालयाला  यावर्षी  ५० वर्ष पूर्ण झाली. शाळेच्या इमारतीचे स्वरूप थोडेफार बदलले, आतली शाळा मात्र त्याहूनही अद्ययावत झालीय. शाळेत बायोमॅट्रिक पद्धतीने विद्यार्थी आणि शिक्षक हजेरी लावतात. शाळा सध्या स्मार्ट बोर्ड,प्रोजेक्टर , L.E.D. स्क्रीन यांनी सज्ज आहे. कोरोनासारख्या संकटाच्या छातीवर पाय देऊन मुलांना शिकवण्यासाठी. सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आलेत. कुठल्याही इंगजी शाळेला लाजवेल अशी ही मराठी शाळा एका गावात आहे आणि डौलात उभी आहे. विद्यार्थी घडवण्यासाठी.मारठी शाळा बंद पडताहेत,त्यांची स्थिती कशी सावरायची अशी नकारात्मक विधानं करत बसण्यापेक्षा चक्रधर ठवकर यांनी शाळा सुस्थापित कशी करता येईल याकडे लक्ष दिले.जे जास्त महत्वाचे होते.
Computer Room.


School Prayer Time.
                  डॉक्टर चक्रधर ठवकर नेहमी म्हणतात की, हे सर्व मी करू शकलो, कारण माझी शाळा , मराठी शाळा आहे. मराठी भाषा माझी  आई आहे. तिचे रडणे , आनंद, अश्रू , सर्व मला जाणवत. साद घालत, समाजाचे आपल्यावर काहीतरी ऋण आहे आणि आपल्याला आपल्या कार्यातून त्याची जमेल तशी परतफेड करायची आहे याची जाणीव करून देते. शाळा हे समाज निर्मितीचे आणि मानवी उत्थानाचे अत्यंत प्रगल्भ माध्यम आहे, हे आपल्या भारतीय लोकांशिवाय आणखी कोणाला नेमक  कळणार? आणि भाषा हा प्रकटीकरणाचा अविष्कार आहे. म्हणून मानसशास्त्र अस सांगत की, शिक्षण हे नेहमी मातृभाषेतूनच झाले पाहिजे. इतर कुठलीही भाषा शिका , त्यामुळे बुद्धिमत्तेत नक्की भर पडते,पण शिक्षण नेहमी मातृभाषेतुनच घ्या. पण भाषा आणि शिक्षण माध्यम याबाबत आम्ही नेमका घोळ करून घेतला.यात भारतच स्थान अव्वल आहे.आणि इथेच भारत हा इंडिया व्हायला सुरुवात झाली. या इंडियाच कदाचित उत्तम असू शकेल पण माझ्या भारताच नाही..कारण  हा देश आजही माझ्यासाठी भारतच आहे,,आणि या भारतावर माझे प्रेम आहे. म्हणून सतत वाटत असते की, और भी बहोत कुछ करना है, 

                     थोडा है थोड़ेकी जरुरत है..............................................

Mr.Chakrdhar Thavkar 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

11 comments:

 1. अप्रतिम लेखन..

  ReplyDelete
 2. अश्विन भानारकरJune 19, 2020 at 10:21 AM

  खरच अप्रतीम लेख आणि वास्तविकता सुद्धा आहे

  ReplyDelete
 3. अतिशय सुंदर शब्दांकन...उत्तम मांडणी ...सत्यता व वास्तविकता याची योग्य सांगड.....अप्रतिम सर

  ReplyDelete
 4. छान लेखन..वस्तुस्थिती दर्शक लेख.

  ReplyDelete
 5. सुंदर लेख आहे.....

  ReplyDelete
 6. खुप सुंदर लेख, अभिमान वाटतो आहे, की मी या शाळेत शिक्षण घेतले , माझी शाळा . :)

  ReplyDelete
 7. खूपच सुंदर लेख आहे शब्दांकन पण खूपच खुरेख आहे आणि वर्तमान परिस्थिती मांडली आहे अतिशय सुंदर 👌👌

  ReplyDelete
 8. अप्रतिम लेख लिहिला आहे, ग्रामीण भागात असे प्रयोग यशस्वी करणे अत्यंत कठीण काम, त्यांची निष्ठा,प्रामाणिक प्रयत्न, अभ्यासपूर्ण नियोजन म्हणून हे शक्य झाले. त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम.या प्रेरणादायी कार्याची ओळख या लेखा मुळे झाली, तेंव्हा आपले ही आभार.
  ज्योत्स्ना मुळावकर

  ReplyDelete
 9. Very great efforts taken by shri. Thawkar sir.

  ReplyDelete
 10. चक्रधर ठवकर आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या आठवणी आणि त्यांचे साहित्य आजही सर्व महानुभाव संप्रदायाला आणि समस्त जणांना प्रेरणा देणारे आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. नक्कीच...चक्रधर दादांचा हा लेख त्यांना संपर्पित आहे...दादा कायम स्वरुपात लक्षात राहतील...किमान माझ्यातरी....आपले खूप खूप आभार...

   Delete

Do not Post any Abusive Content or word or Spam Links in Comment Box.