आजीच पत्र सापडल.......

|| आजीच पत्र सापडल...||

      




                                                         Granny Love, Letter.
                                          


                   “रेवती..अग,किती उशीर? तुला तिथे पोहोचायला साधारण तासभर तरी लागेल.फार उशीर केलास तर ट्राफिक लागेल, आवर बर लवकर.” मीनाताई आपल्या मुलीला सकाळी स्वयंपाक घरातून ओरडून सांगत होत्या. रेवती कशीबशी आवरत सावरत एका हातात बॅग अन एका हातात मोबाईलवर चॅटिंग करत डायनिंग टेबलवर येऊन बसली. 
        
                     नेहमीप्रमाणे आज रेवतीचा चेहरा प्रसन्न दिसत नव्हता.काही दिवसापूर्वीच रेवतीच लग्न जमल होत. आज तिला प्रसादला भेटायला जायचं होत,पण जरा उशीरच झाला होता. बाबा शांततेन नाश्ता करत होते,ती पुढे येऊन बसली तेव्हा तिच्याकडे फक्त नजर वर करून बघितलं.पण शेजारी बसलेल्या आजीला मात्र राहावल नाही म्हणून तीन रेवतीला विचारलच, “काय ग? काय झालय ?आज अशी का गप्प?” पण रेवतीच आजीच्या बोलण्याकडे लक्ष नव्हत,इतक्यात आई तिच्यासाठी नाश्ता घेऊन आली अन तिच्या पुढे ठेवत म्हणाली, “नाश्ता कर आधी ,तो फोन ठेव बर बाजूला, काय चाललाय सकाळपासून त्या फोनवर देवच जाणे.” “आई तुला काही कळत नाही ना तर प्लीज बोलू तरी नको, “ बर..आवर लवकर, उशीर झालाय आधीच.” असे बोलून मीनाताई परत किचनमध्ये गेल्या. हा सगळा प्रकार आजी शांतपणे बघत होती. न राहवून ती पुन्हा म्हणाली “ नाश्ता करतेस ना ग?’ आजीकडे जरा रागाने बघत रेवतीन कसेबसे दोन घास खाल्ले अन हातात बॅग उचलून दरवाजाकडे निघाली.पायात चप्पल घालताना आजीन रेवतीला पुन्हा आवाज दिला
“ रेवती...”
“ काय आहे आजी? जाऊ का नको? का मागे लागला आहात सगळे आज?”
“ अग हो हो जा...पण ऐक आज जरा लवकर ये...
“बर..मी निघते आता” मोबाईलवर चॅटिंग करत रेवती निघून गेली.
                  संध्याकाळी, साधारण ६ ते ६.३० झाले असतील, रेवती घरी परतली.जरा थकल्यासारखी अन उदासच दिसत होती. आईने दार उघडल, रेवतीने आत येऊन चप्पल काढली.आई नेहमीप्रमणे विचारू लागली, “ काय ग काय झाल? भेटलीस का प्रसादला? भेटायला जाणार होतीस ना?” पण रेवती काहीही न बोलता सरळ आत निघून गेली. बाबाही अजून ऑफिसमधून यायचे होते. थोड्यावेळाने रेवती फ्रेश होऊन हॉलमध्ये आली, सोफ्यावर शांतपणे बसत तिने आईला हाक मारली. “आई, आजी दिसत नाहीय कुठे? बाहेर गेलीय का?” “अग,त्या बागेत आहेत ,झाडांना पाणी घालत आहेत.” आई आतूनच बोलली. “ बर रेवती, आजी म्हणाली,तिने तुझ्यासाठी तिच्या खोलीत कसलतरी गिफ्ट ठेवलय,जा बघ.” “ काय आहे?” “ आता मला काय माहित? तुझ गिफ्ट आहे तूच बघ.” “ बर बघते, आई ऐक न मला चहाची नितांत गरज आहे,,देशील जरा..”असे ,म्हणत रेवति आजीच्या खोलीत निघून गेली. तिथे टेबलवर एक जुना पुठ्ठ्याचा बॉक्स होता. त्यावर कुठल्यातरी मिठाईवाल्याच नाव होत..ते हि जरा पुसटच..त्यावरून असे जाणवत होत कि, हा बॉक्स फार जुना आहे...हे असल कसलं गिफ्ट? असा विचार करत रेवतीने तो बॉक्स उघडला. त्यात काही जुनी आंतरदेशीय पत्र होती. प्रथमदर्शनी तिला हे नेमक काय आहे कळलच नाही, ती ते सगळे पत्र शांत डोळ्यांनी बघत होती, इतक्यात मागून आई आली,
“ रेवती चहा..”
“ नको नंतर दे.”
“ अरे, अस काय करतेस रेवती..सकाळपासून तुझ असच ......”
“आई...मी घेते नंतर ,तू ठेव बर तो इथे, अन प्लीज मला जरा वेळ एकट   सोडशील...हं...?”
आई नाक मुरडत निघून गेली.आई जाताच रेवतीने एक पत्र हातात घेतल, त्यावर ‘६’ असा आकडा लिहिला होता,त्यानंतर तिने सगळे पत्र घेतले अन ती पहिले तर त्या वेगवेगळे आकडे लिहिले होते. त्या बॉक्समधे एकूण १३ पत्र होते. १ ते १३ अशी सगळे पत्र ती वारंवार पाहू लागली,त्यावर साधारण खुप जुन्या तारखा होत्या.अन खास म्हणजे प्रत्येक पत्रावरच्या आकड्यांसोबत जसजसा आकडा वाढत होता तशी त्यावरची तारीखही वाढत होती. १ नम्बरच पत्र हातात ठेवून बाकी सगळी पत्र रेवतीने टेबलावर ठेवली अन अलगद एक पत्र उघडून वाचायला लागली.पत्रातल्या ५..६ ओळी वाचून झाल्या असतील तोच मागून आवाज आला,
“तुझ्या आजोबांच पाहिलं पत्र...” हातातली फुलांची परडी ठेवत आजी रेवतीजवळ आली. त्याबरोबर रेवतीने मागे वळून बघितलं. आजी जवळ आली. आजीने हे पत्र मला का दिले असा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर आजीला स्पष्ट दिसत होता. रेवती आता काही बोलणार तोच आजीने विचारल..
“ वाचल?”
“ हं..४..५ ओळी..पण..?’
“ पण हि पत्र तुला का दिली..हाच प्रश्न डोक्यात घोळतोय ना.?
“ हं..आजी सगळी पत्र अजुन वाचली नाहीयत पण इतकी जुनी पत्र..? अग याचा                   पेपरसुद्धा आता जीर्ण झालाय, तरी तू..?
पुढे ठेवलेल्या खुर्चीवर बसत आजी उत्तरली “ हो... तरीही ती मी आजपर्यंत जपून ठेवली आहेत, तुझ्या आजोबांची आठवण म्हणून...”
“ आजोबांची आठवण ? यु मीन हि सगळी पत्र तुला आजोबांनी पाठवली आहे?”
“हं..”
“ मग मला का दाखवतेयस हि पत्र ?”
“ सकाळी Whats Appवर मॅसेज करतांना तुझा चेहरा पाहिला, प्रत्येक मॅसेजनंतर तुझ्या चेहऱ्यावरचे भाव मला कळत नव्हते अस नव्हे..बर का? तिथच लक्षात आल कि प्रसादमधे अन तुझ्यात काहीतरी चाललय..हो ना?
रेवतीने नुसतीच होकारार्थी मान हलवली...अन आजी हसतच तीला म्हणाली.
“ तू एक काम कर, तू हि पत्र वाच, जरा हसायला येईल तुम्हा आजच्या मुलांना पण तरी वाच..मी आलेच..हं..”असे बोलून आजी उठून गेली.रेवती एक एक करून आता पत्र वाचू लागली, मधेच हसायची तर मधेच तिच्या डोळ्याच्या कडा पानावयाच्या.तर मधेच स्वत:च लाजायची..एका दिवसात सगळे पत्र वाचन शक्य नव्हत..पण तीचा पत्र वाचण्याचा उत्साह मात्र कमालीचा वाढला होता..ती खळखळून हसत होती..पत्र वाचता वाचता बराच वेळ गेला हे तिला कळलहि नाही..इतक्यात आजी आली.
“ काय ग? काय झाल इतक हसायला..?’
“ आजी, मला सांग तुमच लग्न जमल होत ना officially ?
“ अग हो... Officially म्हणजे काय? पूर्वी सगळ Officiallyच व्हायचं.”
“ मग?”
“ काय मग ?”
“ तरी आजोबा अन तू पत्रातूनच बोलायचे?”
“ हो त्यावेळी आजच्यासारख Whats App नव्हत ना?”
“बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर  तुम्ही एकदाही लग्नाआधी भेटला नाही? आणि दोन पत्रातल अंतर साधारण एक एक महीन्याच..?”
आजी फुलांचा हार करत बसली होती..हसतच म्हणाली,
“ एक महीन्याच..? एक पत्र तर दोन महिने उशिरा पाठवल. निट बघ सातव्या अन आठव्या पत्राची तारीख..”
“ तुला ते पण लक्षात आहे अजून ? आजी, तुम्हाला चालायचं एवढे दिवस एकमेकांपासून दूर राहून? अगदी एक एक महिना न भेटता न बोलता..”पत्रांवरची तारीख बघत रेवती बोलली.
“ न राहवून सांगणार कुणाला ?आम्हाला चालायचं बाबा त्यावेळी ..अग, हि सगळी पत्रच तर मी गपचूप केळीच्या बागेत जाऊन दुपारी तास तास भर वाचायची...कुणाला कळू नये म्हणून ?”
                       दोघीही अगदि मनमुराद हसत होत्या, साधारण रात्रीचे १० वाजत आले होते. एव्हाना बाबाही आता घरी आले होते पण रेवतीची आईला सक्त ताकीद असल्यामुळे ते आत आले नाही. मधेच मीनाताईंचा आवाज यायचा. “ आई जेवायला बसायचं का ? पान घेऊ का जेवणाची ?” पण रेवती अन आजी बोलण्यात इतक्या गुंग झाल्या होत्या कि त्यांना मीनाताइंचा  आवाज पण येत नव्हता. रेवती हसता हसता आजीला म्हणाली..
“ पण काही म्हण आजी, आजोबा तुझ्यावर जाम प्रेम करायचे हं.?”
हे वाक्य ऐकुन आजी मात्र पुरती लाजली..
“ पण आजी, मला अजूनही कळल नाहीय,हि पत्र तू मला का दिलीस वाचायला?
बोलता आजीने हार पूर्ण केला अन बाजूला ठेवत म्हणाली..
“ हीच तर खरी गम्मत आहे..मला सांग रेवती..तू लहान असतांना संजय तुला वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट द्यायचा..RATHER ते गिफ्ट तो वाढदिवसाच्या एक दोन दिवसा अगोदरच आणायचा, पण ते गिफ्ट तू ज्या दिवशी ते गिफ्ट संजय आणायचा त्या दिवशी उघडून पाहायची कि ज्या दिवशी तुझा वाढदिवस असायचा त्या दिवशी..”
“ काय आजी..गिफ्ट हे बर्थडेच्या आधी कस उघडणार? आधी उघडल तर ते गिफ्ट कसलं ? सगळी मजाच निघून जाणार ना?”
“ बघ, तुझ उत्तर तूच दिलस.”
“ म्हणजे.”
“ अग..लग्न म्हणजे सुद्धा आयुष्याच एक सुंदर गिफ्टच असत. ते सुद्धा अगदी अलगद असच अन योग्य वेळी उघडायच. तरच त्यातल नाविण्य कायम राहत.अन मग सुरु होतो नात्यांचा सुंदर प्रवास, त्यातले सुंदर पैलू, मग ते गुण असो वा दोष, हळूहळू उलगडायला लागतात, अन त्या प्रत्येक पैलुसोबत जुळवून घेत दोघांनीही आयुष्य सुंदर करायचं असत, अन त्यानंतरच ख-या अर्थाने संसार सुरु होतो.पण एकत्र राहून...वेगवेगळे नाही...”
“ पण आजी...”
“ माझे केस उगाच पांढरे नाही झाले बाळा... ह्या पत्रांच अन तुमच्या या मोबाईलमधल्या Techno savvy  मॅसेजच सारखच. फरक फक्त एवढाच कि आम्ही लग्नाआधी थोड अंतर ठेवून बोलायचो तर तुम्ही तरुण मुल अगदी लग्न ठरल्याठरल्या स्वतःबद्दल सगळ सांगून अन समोरच्या बद्दल सगळ विचारून  त्यातली मजाच हरवून बसता. मग त्या नात्यात नाविन्य ते काय ? त्यात काही गैर पण नाही,पण हातच सगळ आधीच द्यायच? लग्न अन लग्नानंतरच आयुष्य हे एखाद्या नवीन पुस्तकासारख असत..रोज नवीन पान उघडून वाचायचं न त्याचा सुगंध घ्यायचा..”
रेवती भारावल्यासारखी आजीकडे पाहत होती. “ पण तुला कस कळल ?”
“ सकाळी तुला सारख मॅसेज करतांना पाहूनच माझ्या लक्षात आल , कि गरजेपेक्षा प्रसाद्मध्ये आधीच गुंतून तू अन तो तुझ्यात गुंतून लग्नानंतरच्या नात्याताली सुंदरता तुम्ही लोक घालवताय. एखादी गोष्ट द्या..पण जरा..हातच राखून, योग्य वेळ येऊ द्या. हे नात लग्नानंतर खूप दूर जाव अन त्या छोट्याश्या रोपट्याच मूळ खोलवर जावी अस वाटत असेल तर, या फुलांच्या हारासारख व्हा..या हाराला जरा निट बघ..एका प्रेमळ धाग्याने या असंख्य फुलांना एकत्र ठेवलय पण प्रत्येक फुलामध्ये थोड अंतर आहे, जर मधल्या त्या हि जागा भरल्या तर वजन वाढेल अन  हा धागा तुटेल..अन विश्वासाचा हा धागा नातरुपी हार निर्माण व्हायच्या आधीच तुटेल.”
            रेवती आजीकडे एकटक बघत होती,हातातली सगळी पत्र कधीच गळून पडली होती.डोळ्यात पाणी होत..आजीला अलगद मिठी मारत ती म्हणाली,
I am sorry..आजी”
रेवतीला दूर करत आजी म्हणाली “ आता तू तुझे मॅसेजेस सोडून पत्र वगैरे पाठवायच्या फंदात पडू नको ग बाई..तुला कळाव एवढ्यासाठी ते सांगितलं, काळानुरूप बदलाव असे तुझे आजोबाच सांगायचे..तुझ ते Whats Appच बर आहे.पण जरा...”
“ हो...कळल..जरा अंतर ठेवून..”
इतक्यात बाबांचा आवाज आला “ आई..रेवती चला आता ,,पान वाढलीत”
रेवतीला उठायला सांगत आजी म्हणाली “ चल आता..जेवूया..
रेवती अन आजी चालायला लागतात, जाताजाता आजी रेवतीला काही बोलत असते “ मला पण माझ Whats App बघाव लागेल .”
“ का ग?”
“ का म्हणजे काय? मला माझे मोर्निंग वॉक ग्रुपचे मॅसेजेस बघावे लागतील ना. अन एक सांगु का,,,गेली ४ तासांपासून तू एकदाही मोबाईल बघितला नाहीय...काय ?”
दोघीही हसतहसत किचनकडे जात होत्या अन बोलण्याचा आवाज जरा कमी कमी होत होता.....................................
                                              

3 comments:

Do not Post any Abusive Content or word or Spam Links in Comment Box.