विष्णु-दा-गामा...३ वर्ष ३ दिवस परिक्रमा

 

विष्णु-दा-गामा...३ वर्ष ३ दिवस परिक्रमा







                  स्वप्नांची दुनिया पण अजब असते ना? झोपेतली स्वप्न सकाळी जाग आल्यावर विरून जातात, पण उघड्या डोळ्यांनी पाहीलेली स्वप्न जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तो पर्यंत मन अस्वस्थ राहतं. अशी स्वप्न झोप लागु देत नाही. झोपेतल्या स्वप्नांचं स्वरूप बदलू शकत, पण उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न एका ध्यासाच स्वरूप घेतात. ती तुमचा सतत पाठलाग करतात. पण यातली एक मजेशीर गोष्ट म्हणजे , ही स्वप्न त्यांचाच पाठलाग करतात जे त्यांना पूर्ण करू शकतात.

                   काही स्वप्न असतात जरा विचित्रच. अमुक एखाद्याला हेच स्वप्न का?असा  प्रश्न तिथे नसतो. कोणी कितीही आणि कुठलीही स्वप्न बघू शकतो. पण काही मोजकेच लोकं ते पूर्ण करू शकतात. आणि ही जगावेगळी स्वप्न जेव्हा पूर्ण होतात तेव्हा ते स्वप्न पाहणारी व्यक्ती मात्र एका विशिष्ट उंचीला पोहोचलेली असते. एक वेगळ वलय त्या व्यक्तीच्या भोवती निर्माण होतं. आणि म्हणून ती व्यक्ती खास असते. बरीच स्वप्न एखाद्या घटनेवरून, एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या कार्याने प्रभावित होऊन पहिली जातात. कोणाला मोठा गायक व्हायचं असतं, कोणाला अभिनय क्षेत्रात काम करून मोठ व्हायचं असत, कोणाला चांगल डॉक्टर व्हायचं असतं, तर कोणाला राजकारणात मोठ होण्याच स्वप्न पडू शकत. पण एखादी व्यक्ती हवामानात होणाऱ्या बदलाचा संदेश घेऊन जमिनीवरून संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्याच स्वप्न पहात असेल तर.......?

             धावपळीच्या या जगात माणसं सर्व काही मिळवू शकतात. पण काही गोष्टी मात्र पैसे देउनही मिळत नाही. त्यापैकी एक म्हणजे , मनःशांती. आपण सगळं मिळवु शकतो. पण मनःशांती मात्र अशी सहज मिळत नाही. त्यासाठी तुमच मन आधी शुद्ध असाव लागतं. आणि याच मनःशांतीसाठी परभणीच्या या तरुणाने अवघी पृथ्वी प्रदक्षिणा केली. ती ही पायी. ३ वर्ष ३ दिवस पायी यात्रा करत त्याने ३५ देश पालथे घातले. आणि या प्रत्येक देशात त्याने हवामान बदलाचा संदेश देत तिथल्या स्थानिक लोकांच्या सोबत  एक झाड स्वतःची आठवण म्हणून लावले.


Vishnudas Chapke on world tour

           विष्णुदास चापके या अवलिया व्यक्तीच नाव. परभणी जिल्ह्यातल्या कात्नेश्वर गावतल्या शेतकरी कुटुंबातला, शेषराव चापके यांचा हा मुलगा. इतर सामान्य माणसांप्रमाणे त्याचही आयुष्य होत. घरी शेतीची जमीन काही फार नव्हती. गरजेपुरती होती. मराठवाडा आणि विदर्भात पाऊस तसा कमीच असतो. निसर्गाच इथे जरा लक्ष कमीच. हीच चिंता विष्णूला असायची. शिवाय पाऊस नसल्याने किंवा कमी असल्याने हवामानात सतत बदल होत राहायचे. ज्याचा थेट परिणाम शेतीवर व्हायचा. आणि याचमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तिथे जास्त होत्या . म्हणूच त्याने हवामानात होणाऱ्या बदलाचा संदेश देण्यासाठी संपूर्ण जग पालथं घातलं. आणि प्रत्येक देशात एक झाड लावून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडं किती मह्त्त्वाची आहे हा संदेश आपल्या जगभ्रमंतीतून दिला.

             पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून विष्णूने इंग्रजी साहीत्यात एम.ए. केले. त्यानंतर त्याने मुंबई गाठली  आणि  मुंबईत एका इंग्लिश वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली. पण मुंबईत पत्रकार म्हणून काम करत असतानाचा विष्णू आणि आताचा विष्णू यात बराच फरक आहे. विष्णू हे स्वतः सांगतो की , तो त्यावेळी जरा वेगळा होता. तो फार उतावळा आणि आक्रमक होता. एखाद्याशी वाद घालायला, हुज्जत घालायला,स्वतःच मत ठामपणे मांडायला, नेहमी तयारच असायचा. मी म्हणतो तेच खरे असे इतरांना पटवून देण्यात त्याला धन्यता वाटायची. एखादी गोष्ट मनात आली रे आली की ती हवी म्हणजे हवी. कुणावर सहज विश्वास ठेवणे त्याला जमत नव्हते. अगदी घरच्यांवर सुद्धा. नवीन माणसाचे तर सोडूनच द्या.  पण जग भ्रमंतीनंतर  जेव्हा तो भारतात परत आला तेव्हा त्याचा हा स्वभाव पूर्ण बदलून गेला होता. कारण असे म्हणतात की, तुम्ही काय आहात? तुमचा खरा स्वभाव कसा ? हे तुम्हाला आपल घर सोडून जेव्हा तुम्ही बाह्य जगात जाता तेव्हाच उत्तम कळतं. आपल्या स्वभावतली अहंपणाची किंवा रागाची सगळी किल्मिषं गळून पडतात. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने माणूसपण कळतं.

           ५० वर्षापूर्वी  व्हाॅइस  अडमिरल  श्री. मनोहर आवटी यांनी जगप्रदक्षिणेची संकल्पना भारतीय नौदलाला सांगितली. त्यांचे स्वप्न कमांडर दिलीप दोंदे यांनी समुद्रमार्गे प्रवास करून पूर्ण केले. याच कमांडर दिलीप दोंदे यांची मुलाखत घेण्याची संधी विष्णूला मिळाली.  आणि तिथूनच त्याच्या डोक्यात पृथ्वी प्रदक्षिणेची संकल्पना उभी राहिली. आपणही पायी पृथ्वी प्रदक्षिणा करू असे स्वप्न त्यावेळी त्याने पाहिले. पृथ्वी प्रदक्षिणेचा ध्यासच त्याने घेतला. कमांडर दिलीप दोंदे यांची मुलाखत झाल्यावर निघताना जेव्हा त्याने त्यांना विचारले की, त्याला हे जमेल का? तेव्हा त्यांनी “ त्यात कठीण काय आहे, निघ” असे म्हटले. या वाक्याने विष्णूला अधिक बळ दिले. आणि कुठलाही प्रायोजक मिळवण्यात किंवा पूर्वतयारी करण्यात वेळ न घालवता विष्णू १९ मार्च २०१६ ला ठाण्याहून जगाच्या प्रवासावर निघाला. आणि सलग तीन वर्षांनी म्हणजेच १९ मार्च २०१९ला ही परिक्रमा पूर्ण झाली.

Vishnudas Chapke, Traveler, World tour .

                    जगभ्रमंतीला निघालेल्या विष्णूचा सुरुवातीला तीन महिने प्रवास करण्याचा मानस होता, पण त्याचा हा प्रवास ३ वर्ष ३ महिन्यांवर गेला. या प्रवासात त्याला अनेक अडचणी आल्या. या सगळ्या अडचणींवर मात करत त्याने तो जिथे जिथे गेला तिथल्या लोकांचे मन जिंकले. विष्णू सांगतो त्याने कधीच कुठल्या गोष्टीचे नियोजन केले नाही. एका देशात तो ३ दिवसांच्यावर थांबायचा नाही. ठाण्याहून निघालेला विष्णू ...कोलकाता आसाम, म्यानमार, थायलंड, लावोस , व्हिएतनाम, या मार्गे चीन पर्यंत पोहोचला. तिथे त्याला हॉंगकॉंगला व्हिसा न मिळल्याने तो पुढे ऑस्ट्रेलियाला निघाला. कधी पायी तर तर कधी रस्त्यात एका बोर्डवर जिथे जायचे त्या ठीकणाचे नाव लिहून तो उभा राहायचा. आणि जिथपर्यंत लिफ्ट मिळेल तिथपर्यंतचा प्रवास करायचा आणि पुढे परत पायी..असा त्याचा प्रवास चालला होता.

           कधी कधी पैसे संपायचे. कारण ज्या देशात जायचे त्या देशाचा व्हिसा लागायचा. आणि जवळचे पैसे संपायचे. अश्यावेळेस मित्र, मित्रांचे मित्र, कधी फेसबुकवर अपील करायचा. तर फारच गरज भासल तर क्राउड फंडिंगच्या माध्यमातून पैसे जमवायचा.पैसे मिळाले तर कधी A.T.M काम करत नव्हते. कधी रेल्वे स्टेशनला झोपायचा तर कधी कुठल्या मंदिर, धर्मशाळेत आसरा शोधायचा. ज्याने लिफ्ट दिली त्याच्यासोबत जायचा..पण बरचसे अंतर त्याने पायी चालतच प्रवास केला.  पण तो जिथे जिथे जायचा तिथे एक झाड लावायचा. कारण ती त्या देशातली एक आठवण  त्याच्यासोबत कायम राहणार होती. या सगळ्यात एक गोष्ट तो काढच विसरला नाही,ती म्हणजे आईला रोज फोन करणे. आईशी त्याचे नेहमी बोलणे व्हायचे. तो आईला सगळा वृत्तांत फोन करून सांगायचा.


Vishnudas Chapke Planting Every Country

              विष्णूला मराठी हिंदी इंग्रजी या भाषेव्यतिरीक्त थोडी पर्शियन आणि फ्रेंचही येते. वेगवेगळ्या देशात गेल्यानंतर याचा त्याला बराच फायदा झाला. त्याला भाषेची कधी अडचण गेली नाही. कुठेही गेल्यावर तिथल्या स्थानिक भाषेमधले ५० शब्दही संवाद साधायला पुरेसे असतात असे तो म्हणतो. याचा फायदा त्याला चिली देशात झाला. तो ज्यावेळी चिली देशात होता त्यावेळी तिथल्या जंगलांना आग लागली होती. त्यामुळे त्याला तिथुन बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यावेळी चिली देशाने ती राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केली. स्वाभाविक होते की अश्यावेळी त्याला त्या देशात राहण्याशिवाय पर्याय नव्हता. विष्णूने नेहमीप्रमाणे आईला फोन केला. सगळा वृत्तांत सांगितला. तेव्हा आईने काळजी  करण्यापेक्षा , आपण ज्या देशात राहतो तो देश मातृभूमिसारखा असतो, तू भारतात असता आणि इथे जर असे झाले असते तर तू काय केले असते?” असे विचारले आणि “तुला जी जमेल ती  मदत तिथल्या लोकांना कर” असे सांगीतले. तेव्हा फायर ब्रिगेडच्या गाड्या जवळ होत्या.त्याने फायरमन सोबत काम करण्याचा प्रयत्न केला. पण ते काम जोखमीचे होते. त्यासाठी सराव लागतो. असे त्याच्या लक्षात आले..या सर्वात त्याच्या लक्षात आले की, इथे काही लोकांना स्थानिक भाषेची आणि स्थानिकांना इंग्रजी भाषेची एकमेकांना समजण्यासाठी अडचण  होत आहे. कारण चिली देशात स्पनीश भाषा आहे. तेव्हा त्यांने ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. विष्णूला इंग्रजी चांगली येते असे चिली देशाच्या त्या फायरमन लोकांच्या लक्षात आले त्यांनी त्याला भाषांतरकार आणि स्वयंसेवक म्हणून काम करायला सांगितले.जेणेकरून स्थानिकांना पुढच्या लोकांना जे सांगायचे आहे ते कळेल.


Vishnudas chapke, Michelle Bachelet
 

                चिली देशात आपत्कालीन स्थितीत विष्णूने केलेल्या ह्या मदतीची विशेष नोंद झाली. ज्यावेळी परिस्थिती निवळली आणि ती पूर्वपदावर यायला लागली तेव्हा, तिथे लोकांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले.त्याची पाहणी करायला चिलीच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षा मिशेल बाशेले आल्या होत्या. सर्व पाहणी झाल्यानंतर फायरब्रिगेडच्या लोकांनी मिशेल यांना विष्णूने केलेल्या बहुमुल्य मदतीबद्दल आणि कामाबद्दल सांगितले. त्यावेळी मिशेल यांनी त्याचे कौतुक केले आणि त्याचा सत्कारही केला. ही गोष्ट त्याच्यासाठी संपूर्ण प्रवासातली सगळ्यात महत्त्वाची आणि गौरवाची गोष्ट होती.

               सामान्य माणसाला जरा विचित्रच वाटेल.अशी ही जगभ्रमंती विष्णुसाठी मात्र खूप अमूल्य होती. कारण डोळसपणे त्याने एक स्वप्न पाहिले होते. आणि नुसतेच पहिले नाही तर ते तो जगला पण.  या पृथ्वी प्रदक्षिणेने त्याला बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी शिकवल्या. आयुष्यभर पुरतील असे अनेक अनुभव दिले. अमेरीका, पाकीस्तान आणि कानडा सारख्या देशांनी त्याला व्हिसा न दिल्याने , हे देश न करताच त्याला त्याची भ्रमंती आटोपती घ्यावी लागली. त्याच्या मूळ स्वभावात बराच बदल झाला. तो शांत झाला. समोरच्याचे ऐकून घेण्याची वृत्ती त्याच्यात निर्माण झाली. एखादी व्यक्ती जर त्याच्यावर ओरडली तर तो आता आधी त्या व्यक्तीला शांत होऊ देतो, लगेच प्रतीक्रीया देत नाही आणि मग स्वतः शांतपणे त्याच्याशी बोलतो. आज तो सहज कुणावरही विश्वास ठेवतो. प्रत्येक व्यक्तीत चांगले शोधता येत असे तो  म्हणतो.  विष्णू त्याच्या संपूर्ण भ्रमंती दरम्यान रोजच्या दिवसाच्या अनुभवावरून ब्लॉग लिहायचा. आणि आता तो या सगळ्या गोष्टींवर एक पुस्तकही काढणार आहे. त्याने लिहिलेल्या ब्लॉग आणि पुस्तकाच्या पैशातून तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला मदत करतो. या जगभ्रमंतीतून त्याने काय मिळवले असे अनेक लोक त्याला विचारतात. तेव्हा तो एकच सांगतो की, मी मनःशांती मिळवली. आनंद घेतला आणि तो वाटला.

               इतक सगळं फिरल्यावर विष्णु आवर्जून सांगतो की, आपल्या मातृभूमीपासून दूर गेल्यावरच कळतं की, आपला मायदेश काय आहे. जगात मोफत काहीईच नसत हे त्या ३  वर्षांनी त्याला शिकवलं. या देशात समस्या असल्या तरी आयुष्य जगण्यासाठी हा देश सर्वोत्तम असल्याच विष्णू आवर्जून सांगतो. जगभ्रमंती क्कारून जेव्हा तो परत आला तेव्हा त्याला अनेकांनी विचारले की,  काय काय नवीन खाल्ले? तेव्हा तो म्हणतो की, बरच काही खाल्लं पण परत आल्यावर आवर्जून प्यायलो तो उकळलेल्या दुधाचा चहा. तो इतर कुठेही मिळाला नाही. प्रवासच एक स्वप्न पूर्ण झालं. आता हा स्थायीभावही खूप महत्त्वाचा वाटतो. आज त्याला लोक भारताचा विष्णू दा गामा म्हणुन ओळखतात. पण त्यामागे त्याची जीद्द त्याची मेहनत, त्याचा ध्यास विसरता कामा नये.

                या जगात प्रत्येक माणुस जे करतो त्यामागे काही ना काही कारण किंवा उद्देश्य जरूर असतं. चांगल किंवा वाईट हा मुद्दा नंतरचा. पण एक मात्र आहे की, चांगल्या  उद्देशाने केलेलं काम चांगलच फळ देत. स्वप्न पहा ..ते जगा आणि ते पूर्ण  करण्यासाठी आवश्यक असलेल्या झपाटलेपणाची कास मात्र कधी सोडू नका. तरच ही स्वप्न पूर्ण होऊ शकतील.पण हे करताना इतर कुणालाही त्रास होणार नाही, कुणी दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या.

 


12 comments:

  1. Literally never read such long marathi articles.. but loved the way this was wrote and got hooked up to it from the 1st para..
    Awesome reading...

    ReplyDelete
  2. 😃😃😃 Thank you Ajinkya..

    ReplyDelete
  3. Such a Inspiring morning,,,
    While read this article I feel
    मी स्वतः या प्रवासाचा अनुभव घेतला की काय...

    ReplyDelete
  4. Khup chhan Lihiley. Kharech Great.

    ReplyDelete
  5. Kharach Bhartachya Vishnu Da ne je kamavale khup molache aahe. Mahatvachi goshta mahnnje mana sarkhe vagle.

    ReplyDelete
  6. खूप छान अनुभव अमोल आणि त्याने जे कमावले अत्यंत अनमोल आहे तूझ लिखाण पण खूपच खुरेख आहे 👍

    ReplyDelete
  7. Wonderful Journey.👍👍👍

    ReplyDelete
  8. आयुष्य हा जीवनभर प्रवासच आहे. पण भौतिक पातळीवर किती रोमांचक आणि कठीन असतो. याच सुंदर आणि सहज लेख सांगून जातो.... अभिनंदन आणि विष्णू एक प्रेरणाच आहे.. विदर्भ आणि मराठवाडा आणि शेती संवेदनशील विषय... पर्यावरण सांभाळृया .... आम्हीही खारिचा वाटा देत आहोत... सुंदर लेखन

    ReplyDelete
  9. Very inspiring.. Life is a journey, we should travel. We don't have roots on our leg like trees, also don't have wings like birds. But we have vision to capture a moment and preserve it for our grand members..
    Loved your dream Vishnu..!
    Nicely arranged words..!

    ReplyDelete
  10. Nice Article, loved experience shared of Vishnu Da Gama

    ReplyDelete
  11. आपके बेवसाईट पर दी गई जानकारी बहुत ही महत्व पूर्ण एवं उपयोगी हैं
    www.gyanitechnews.com

    ReplyDelete

Do not Post any Abusive Content or word or Spam Links in Comment Box.