उत्तरांना पडलेला प्रश्न - शारंगपाणी

      उत्तरांना पडलेला प्रश्न - शारंगपाणी


         



                          प्रबळ इच्छाशक्ती आणि जिज्ञासूवृत्ती या गोष्टी ज्याच्याकडे असतील तो जगातलं कुठलही कोडं, कुठलीही समस्या सहज सोडवू शकतो. पण हे सगळ वाटतं तितकं सोपं कधीच नसतं. कधी कधी परीस्थिती अशी येते की क्षणभर आता सगळं संपल अस वाटत असत. ज्याच्यासोबत असे कठीण प्रश्न निर्माण होतात त्याच्या आत , त्यावेळी नेमकं काय चालल असेल याची कल्पना त्याच्याशिवाय इतर कुणीच करू शकत नाही. या परिस्थीतीत जो दुःख करत बसण्यापेक्षा खंबीरपणे, संयमाने आणि तटस्थपणे सगळ्या गोष्टींना समोर जातो तोच या जगात आपलं स्थान इतरांपेक्षा वेगळं करू शकतो. सामान्य लोकांच्या गर्दीत उभं राहण्यापेक्षा एक विशिष्ट क्लासची गर्दी त्याच्यासाठी निर्माण होते. 


                        वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या रुग्णाचा जेंव्हा E.C.G. केला जातो तेव्हा असे म्हणतात की, त्यावरची रेष ही कधीच एका सरळ रेषेत येऊ नये. ती रेष चढ-उतार अश्या प्रकारची असावी. आयुष्याचे पण असेच आहे. सुख तर फक्त सुख किंवा दुःख तर फक्त दुःख असे कधीच नसते. सुख दुःखाचा हा उन्ह-सावलीचा खेळ असाच सुरु राहतो. आयुष्यातले चढ उतार तुम्ही  जिवंत आहात हे सांगतात. पण काही लोक असतात की त्यांच्या आयुष्यात ह्या उतारांना कधी किंमतच नसते. त्यांच्यात इतकी सकारत्मकता  असते की ह्या गोष्टींनी ते कधीच खचून जात नाही. समस्या नाही, असा एक तरी जीव दाखवा. जन्माला आला त्याला पृथ्वीवरचे सगळे नियम लागू झाले. पण आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीशी दोन हात करून विजय मिळवण्याची मजाच काही और असते. सामान्याचा असामान्यतेकडे जाणारा प्रवास इथून सुरु होतो.


                        काही लोक आलेल्या परिस्थितीला जसे आहे तसे स्विकार करतात. तर काही लोक त्या परिस्थितीला परतवून लावण्याची ताकद ठेवतात. ही अशी परिस्थिती आलीच कशी  ? याचा सतत शोध घेत असतात . आणि ती आली तर आता यातूनही निघुन आयुष्य सुंदर कसे करता येईल याकडे त्यांचे लक्ष असते.


                             

       शारंगपाणी मनोहर पंडित. व्यक्ती एक पण प्रश्न अनेक. एक प्रश्न सुटला की, दुसरा पुन्हा दाराबाहेर उभाच. पण या प्रश्नांना घाबरून जाणारा त्यांचा स्वभावच नाही. तर त्यांच्या मुळाशी जाऊन उत्तरं शोधणे आणि त्याच्याशी दोन हात करणे हेच त्यांना माहित आहे. उंच देहयष्टीचे शारंग पंडित हे आज संगीत क्षेत्रात बऱ्याच लोकांना त्यांच्या  एका  नव्या शोधासाठी माहित आहेत. भात्याचा वापर न करता वाजवता येणारी हार्मोनियम हा त्यांचा विशेष शोध. अश्या प्रकारची हार्मोनियम तयार करणारे ते एकमेव आहेत. खरतर हार्मोनियम म्हणजेच बाजाची पेटी किंवा ऑर्गन असुद्या , जोपर्यंत भात्याद्वारे हवा आत जाणार नाही तोपर्यंत हे वाद्य वाजत नाही. मग अशी काय गरज निर्माण झाली असेल की, भाता नसलेली पण तितक्याच सहजतेने वाजणारी हार्मोनियम त्यांना तयार करावी लागली असेल  ? काही प्रश्नांची उत्तरं भूतकाळात गेल्याशिवाय मिळत नाही.


                      आपल्या अवती भोवती घडणाऱ्या गोष्टींचे सखोल ज्ञान घेण्याची आवड शारंग काकांना होती. मुंबईतल्या विरारमध्ये त्यांच बालपण गेल. कुठलाही विषय हाताशी आला की त्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्याच्याबद्दल सर्व माहिती मिळवणे हा त्यांचा मूळ स्वभाव. याच स्वभावाचा फायदा त्यांना भात्याचा वापर न करता वाजणारी हार्मोनियम तयार करताना झाला. एका वेळेस साधरण १५ ते २० कि.मी. सायकल चालवणे, सलग २ ते ३ तास पोहणे, बेचक्या एअर गनने अचूक नेम धरणे, उत्तम नानचाकू फिरवणे,  किंवा कॉलेजमध्ये व्हॉलीबॉल खेळून टीमचे कप्तान पद मिळवणे आणि अश्या अनेक गोष्टींनी देवाने त्यांना समृद्ध केल होत. आणि या सगळ्या भाऊगर्दीत अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहानपणापासून असलेली संगीताची आवड. आणि त्यात काहीतरी नवीन करण्याची जिद्द. संगीत मनपासून आवडायचे, ते अधिक वृद्धींगत व्हावे ह्यासाठी त्यांनी श्री एडवणकर ह्यांच्याकडे हार्मोनियम आणि श्री कुर्लेकर ह्यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेतले. 


                         हार्मोनियम त्यांना खूप आवडायची. हार्मोनियमवर त्याची बोटं सफाईने चालतात. हार्मोनियमचा नियमित आणि मनपासून केलेल्या रियाजामुळे त्यांची बोटं किबोर्डवरपण सहज आणि सफाईने फिरू लागली होती. म्हणूनच पुढे त्यांना विरारमधल्या, नवरात्रीत चालणाऱ्या सगळ्यात मोठ्या गरब्यात कीबोर्ड आर्टिस्ट म्हणून काम मिळालं. त्यांच्या वादनाने तेव्हा शेकडो लोकांना गरब्यात नाचायला भाग पाडले. हे अनेक वर्ष सुरु होत. आणि अश्याच एका नवरात्रीत कीबोर्ड वाजवत असताना त्यांना खुप ताप आला. पण त्यापेक्षा वादनाचा आनंद इतका होता की तापाकडे त्याचे दुर्लक्ष झाले आणि तो पुढे अंगावर काढला गेला.


                     

नवरात्र संपले, दसरा झाला. पण त्यांना कुठे माहिती होतं की, या सगळ्यानंतर त्यांच्यापुढे दैवाने एक परीक्षा वाढून ठेवलीय ती ? ताप डोक्यात गेला आणि मॅनिंजायटीस सारख्या आजाराने त्यांना धरले. एक प्रश्न अजून सुटला नव्हता तोच पुढचा तयार. काही काळाकरता दोन्ही डोळ्यांनी दिसायचे बंद झाले. जवळजवळ एक  महिना जसलोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले. पण या सगळ्याची तमा त्यांनी कधी बाळगली नाही.  ,म्हणतात ना एक कलाकार हा २४x७ कलाकाराच असतो. त्याचा डोळ्यात, वाणीत, आणि  शरीरातल्या प्रत्येक कणाकणात कलेशिवाय कशालाच स्थान नसतं. अश्याही परिस्थीतीत ते म्हणायचे की, "डोळ्यांना जरी दिसायचे बंद झाले असले तरी, बोटांना अजूनही हार्मोनियमच्या बटणांचा पत्ता माहित आहे. त्याने नक्कीच पोट भरू शकेन."

                      अनेकदा आपल्याला असे वाटत असते की, आता सगळं ठीक झालय. पण नियतीच्या डोक्यात काय सुरु आहे ह्याची कल्पना मात्र सामान्य माणसाच्या अवाक्याबाहेरची गोष्ट आहे. शारंग काकांचही सुरळीतच चाललं होत , पण सुरवातीलाच म्हटले ना की, एक सुटला की दुसरा प्रश्न उंबरठ्याबाहेर उभाच असायचा...नियतीने बहुतेक प्रश्नांची मालिकाच सुरु केली होती. सामान्य माणसांची असतात तशी त्यांचीही काही स्वप्न होती. घरात पत्नी आणि दोन मुलं आहेत. संसार छान करावा, मुलांसाठी काही चांगले करावे असे त्यांनाही वाटत होते. पण  अश्या कर्तृत्त्ववान माणसाकडून अजून काहीतरी सृजनात्मक आणि सकारात्मक करवून घ्यावे अशी नियतीची इच्छा असावी. 


                     २००४ साली एक दिव्य अग्निपरीक्षा त्यांच्यापुढे येऊन ठेपली. आणि पार्किन्सन्स म्हणजेच कम्पवायू सारख्या दुर्धर आजाराने त्यांना आपल्या विळख्यात घेतले. डॉक्टरांनी उत्तर दिले की, येत्या काही वर्षात ते पूर्णतः बिछाना पकडतील. आणि त्यांनी गाडी चालवणे आता बंद करावे. प्रबळ इच्छाशक्ती आणि कमालीचा आत्मविश्वास ह्याचे बाळकडूच घेऊन जन्माला आलेले शारंग काका इथे तरी कसे हरतील ? ते हतबल झाले नाही. खचले नाही. तर तीच  हिम्मत ठेवत आत्मविश्वासाने पार्किन्सन्स आजारासोबत त्यांनी पुढे वाटचाल करायला सुरुवात केली. आजही अश्या परिस्थितीत ते सलग १० ते १२ तास गाडी चालवण्याची हिम्मत ठेवतात. या सगळ्यात त्यांच्या पत्नीची साथ ही मात्र लक्षात घेण्यासारखी आहे. 

               

                   भात्याचा वापर न करतासुद्धा वाजणारी ही हार्मोनियम पूर्ण झाली, तेव्हा शारंग काकांनी आणि त्यांच्या परिवाराने अशी हार्मोनियम अजून कुठे आहे का ? किंवा तिचा इतर कोणी शोध लावला आहे का याची शोधाशोध केली. पण असा प्रकार अजून कुणीही केलेला नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी ह्या संशोधनासाठी पेटंट घ्यायचे ठरवले. आणि त्यासाठी लगेच अर्ज केला. लवकरच त्यांना ह्याचे पेटंट मिळेल.हार्मोनियम क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शारंग काकांचे  खूप कौतुक केले. त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे २२ श्रुती हार्मोनियमच शास्त्रीय गणित मांडणारे पंडित डॉ. विद्याधर ओक. त्यांनी तर त्यांचं लिखित पुनर्जन्म हे पुस्तक भेट दिले  आणि म्हणाले " शारंग तु पुढच्या दहा वर्षात हार्मोनियमचा भाता घालवतोस..!!" हे त्यांचं बोललेलं वाक्य प्रमाणपत्रच आहे. आत्ताच मार्च मध्ये ठाण्याच्या युनिटी ह्या  संस्थे कडून काकांचा ह्या शोधासाठी सत्कार करण्यात आला. आणि जानेवारी २०२० मध्ये बेंगलोर येथे आयोजित झालेल्या वर्ल्ड हार्मोनियम समिट २०२० मध्ये शारंग काकांचा ह्या शोधाकरता गौरव करण्यात आला. 


                 

          स्वर शारंग नावाने प्रसिद्ध होत असेलेली ही हार्मोनियम हळूहळू जनमाणसात मानाच  स्थान  मिळवू लागली आहे. काका स्वतः ही हार्मोनियम, कंपवायूचा त्रास होत असतानाही वाजवतात. पण त्याच सोबत  ही हार्मोनियम आता विक्रीलाही उपलब्ध आहे. ५ हार्मोनियम विकल्या सुद्धा गेल्या. त्यातली सगळ्यात पहिली स्वर शारंग हार्मोनियम श्री. प्रसन्न घैसास ह्यांनी घेतली. एक हार्मोनियम अमेरिकेत गेली आहे आणि एक चिन्मया आश्रमचे गुरू श्री तेजोमयानंद स्वामी ह्यांच्या चरणी रुजू झाली आहे.


                  किती सह्ज आपण सांगून जातो ना, की मला हे प्रॉब्लेम्स आहे मला ते प्रॉब्लेम्स आहेत. आपण सतत समस्या सांगण्यात धन्यता मानतो. पण एखाद्या समस्येच्या मुळाशी जाऊन तिला समूळ बाहेर फेकण्याची आपली  इच्छा मात्र कधी नसते. शोधक वृत्ती ही  खरतर प्रत्येकात असते. निसर्ग आपल्याला ती जन्मतःच देतो. म्हणुन तर लहान मुलं त्यांच्या अवतीभोवती काय चाललाय याचा सतत शोध घेत असतात. आपल्याला प्रश्न विचारत असतात. परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. म्हणुन तर कंपवायू किंवा पार्किंसंस सारखा दुर्धर आजार होऊनही शारंग काका ह्या हार्मोनियमचा शोध लावू शकले. आणी नुसताच शोध लावला नाही तर पुन्हा एकदा हार्मोनियम वाजवू लागले. 


                आपल्या कलेशी इमान राखणारा एक कलाकार एखाद्या वेळी उपाशी राहू शकेल पण तो त्याच्या कलेशिवाय राहू शकत नाही. एक मार्ग बंद झाला तर तो अनेक मार्ग शोधून काढतो. पण जी लोक आपल्या कलेचा उपयोग केवळ पैसा कमवण्यासाठी करतात त्यांच्यासाठी हे नाही. कारण त्याची एकाग्रता आणि लक्ष पैसा कमावण हेच असतं. कलेची साधना किंवा त्याची भरभराट हे त्यांच लक्ष कधीच असू शकत नाही. असो....भाता न वापरताही वाजवता येणारी ही हार्मोनियम काकांनी सुरुवातीला स्वतःसाठी तयार केली होती पण आज ती अनेक कलाकरांसाठी उपयुक्त ठरेल. त्यांनी हे दाखवून  दिले की , अपंगत्व हे शरीराला येत, मनाला नाही..प्रबळ इच्छाशक्ती आणि जिज्ञासा ह्या दोन गोष्टी असतील तर कठीण कामही  सोपं होतं.



14 comments:

  1. Such a inspiring story... 🙏🏻 and superbly written... 👏🏻👏🏻
    Keep sharing great stories...

    ReplyDelete
  2. Khup abhimaan vatato kakancha ani khup shikayla suddha milate amchyasrkhya tarun pidhila

    ReplyDelete
  3. वाह्ह अतिशय सुंदर प्रबल इच्छाशक्ती आणि परिश्रम करण्याची तयारी असली कि नशिबाला ही झुकावं लागत... याच जिवंत उदाहरणं आहे हे...

    ReplyDelete
  4. कल्पना म्हात्रेJuly 31, 2020 at 2:49 PM

    सर्व आजारांवर मात करून जिद्य व प्रगती. खूपच सुंदर.

    ReplyDelete
  5. Well that story shows the man he is
    He is man full of soultion and answers....its well written and up to the mark...God bless him always

    ReplyDelete
  6. Khup chan kakanchi story khup chan aahe ekhadi film banavi aashi real hero

    ReplyDelete
  7. Sharang Kaka yancha Harmonium pream khup kahi shikavto, tyanchya baddal vachat astana mi emotional jhale. Amol kharch tune real Heroes la aaplya blog madhe jaaga dili aahe.

    ReplyDelete
  8. व्वा खूपच छान काकांच्या ह्या अवघड परिस्थिती ला पार करून पुढे जाण म्हणजे कौतुकास्पद आहे 👍👍

    ReplyDelete
  9. प्रेरणा देणारे , जिद्द आणि चिकाटी असणारे अनोखे.व्यक्तिमत्त्व !!

    ReplyDelete
  10. It was heart touching! And your writing make it effective and live.
    Great Amol! Keep writing! All the best!

    ReplyDelete
  11. Good Innovation in Music..nice story..

    ReplyDelete
  12. Very nice...never give up ..and if you have strong desire so that time no one stop you.... really great ..and nice article .keep it up and open all great hearts in front of world.

    ReplyDelete

Do not Post any Abusive Content or word or Spam Links in Comment Box.